जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध कायम, पेट्रोकेमिकल रिफायनरीबाबत लवकरच भूमिका

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा नागरिकांच्या आरोग्यासाठी घातकच असल्यामुळे शिवसेनेचा या प्रकल्पाला कायमच विरोध राहिला आहे. त्याचप्रमाणे राजापूर तालुक्यात येऊ घातलेल्या प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाबाबतची शिवसेनेची भूमिकाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच जाहीर करतील, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

रत्नागिरीतील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आज आदित्य ठाकरे रत्नागिरीत आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात पालकमंत्री रवींद्र वायकर आणि इथल्या आमदारांनी विकासकामांचा एक धडाका लावला आहे. आज विकासकामांच्या भूमिपूजनासाठी मी आलो होतो. पुन्हा परत अन्य काही विकासकामांच्या भूमिपूजनासाठी मी रत्नागिरीत येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी आर्वजून सांगितले. पुढे ते म्हणाले की, युती तुटून अडीच वर्षे झाली. त्यामुळे त्यावर बोलण्यापेक्षा आम्ही आमच्या कामावरच बोलू. निवडणुका होऊन गेल्या आहेत. त्यामुळे आता मधली पाच वर्षे ही कामांसाठीच असतात. शिवसेना आणि युवा सेना राज्यात अतिशय उत्तम काम करत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

सर्वच पालकमंत्री मुख्यमंत्र्यांना भेटतील
जिल्हा नियोजनमधील मोठय़ा प्रमाणात निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांसाठी वापरण्यात येणार आहे. याबाबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की, ही परिस्थिती अन्य जिल्ह्यांतही आहे. त्यामुळे सर्वच पालकमंत्री मुख्यमंत्र्याना भेटून आपली भूमिका मांडतील असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले.

तुमच्या समस्या लिहून द्या…मी त्या सोडवेन…
आयटीआयमधील विद्यार्थींनीच्या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला.तुम्ही कोणता विषय घेतला आहात, तुम्हा शिकताना काही अडचणी येतात का असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना विचारले तेव्हा एका विद्यार्थिनीने आम्हाला एस.टी.चा पास मिळत नाही, आमचा निकाल लवकर लागत नाही या समस्या मांडल्या. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्ही तुमच्या सर्व समस्या मला लिहून द्या, मी त्या निश्चितच सोडवेन असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.

मुलं थांबलेली पाहून ते गाडीतून उतरले…
लांजामध्ये युथ ऍक्टिव्हीटी सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन आटपून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गाडीतून पुढच्या कार्यक्रमासाठी निघालेले असताना एका बाजूला मोठ्या संख्येने मुले थांबलेली पाहिली. आदित्य ठाकरे गाडीतून खाली उतरले त्यांनी मुलांशी हस्तांदोलन केले. तुम्ही कुठे निघालाय असं आपुलकीने विचारताच…मुलं म्हणाली एमएससीआयटीच्या क्लासला.

यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार सदानंद चव्हाण, उदय सामंत, राजन साळवी, जि.प.अध्यक्षा स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, शिक्षण सभापती दीपक नागले, पं.स. दीपाली दळवी, सुभाष गुरव, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, प्रकाश कुवळेकर, संदीप दळवी, नगराध्यक्ष राहुल पंडीत, उपनगराध्यक्ष राजेश सावंत, उद्योजक किरण सामंत, महिला आघाडी जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, तालुका संघटक सायली पवार, शहर संघटक मनीषा बामणे, रत्नागिरी विधानसभा संपर्कप्रमख मंगेश साळवी, युवा सेनेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, युवा सेना जिल्हा युवाधिकारी ऍड. सुजित कीर, तालुका युवाधिकारी तुषार साळवी, धनंजय गांधी, गुरुप्रसाद देसाई, लांजाच्या नगराध्यक्षा संपदा वाघधरे, प्रथमेश साळवी, सर्व नगरसेवक, जि. प. आणि पं. स. सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

विकासकामांचा झंझावात
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आज ढोलताशांच्या गजरात…फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम लांजा येथील युथ ऍक्टिव्हिटी सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर झापडेकांटे येथील रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात संपन्न होताच हा भगवा जल्लोष रत्नागिरीत दाखल झाला. शहरातील साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर साळवी स्टॉप येथील युथ ऍक्टिव्हिटी सेंटरचे भूमिपूजन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर आयटीआयमधील मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण युवासेना प्रमुखांच्या हस्ते झाले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱया चिंचवड-वेसुर्ले रस्त्याचे आणि सोमेश्वर येथे उभारण्यात येणाऱया बंधाऱ्याचे भूमिपूजन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

लांजा शहरातील युथ ऍक्टिव्हिटी सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार राजन साळवी, उदय सामंत, युवा सेना जिल्हा युवाधिकारी ऍड. सुजित कीर, जि. प. अध्यक्षा स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, तालुकाप्रमुख संदीप दळवी, प्रकाश कुवळेकर, नगराध्यक्षा संपदा वाघधरे.