पीएफचे पैसे बुडविणाऱ्या वन अबव्हच्या मालकांना अटक

सामना ऑनलाईन । मुंबई

वन अबव्हच्या सुमारे १०० कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे बुडविल्याप्रकरणी या रेस्टो पबच्या जिगर संघवी, क्रिपेश संघवी आणि अभिजित मानकर या तीन मालकांना पोलिसांनी गुरुवारी पुन्हा अटक केली. कमला मिलमधील २९ डिसेंबरला लागलेल्या आगीच्या गुह्यात हे तिघेही तुरुंगात होते.

कमला मिलमधील मोजो बिस्त्रो आणि वन अबव्ह या रेस्टो पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर वन अबव्हचे जिगर, क्रिपेश, अभिजित आणि मोजो बिस्त्रोचे युग पाठक, युग टुली यांना अटक करण्यात आली. हे प्रकरण सुरू असतानाच प्रॉव्हिडंट फंड निरीक्षकाने वन अबव्हच्या मालकाविरुद्ध ना. म. जोशी पोलीस ठाण्यात तक्रार केली. यामध्ये या तिघांनी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंडचे पैसे भरलेच नसल्याचे म्हटले होते. प्राथमिक चौकशीत यामध्ये तथ्य आढळले.

प्रॉव्हिडंट फंडचे पैसे हा पगाराचाच एक भाग असून ती मिळणे प्रत्येक कर्मचाऱयाचा हक्क आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना फसविल्याप्रकरणी १९ जानेवारीला वन अबव्हच्या मालकांवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. प्रॉव्हिडंट फंड निरीक्षक आणि ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली. या चौकशीत मालकांनी कर्मचाऱ्यांचे मे २०१६ पासून पैसेच भरले नसल्याचे उघड झाले. या प्रकरणात अधिक चौकशीसाठी पोलिसांनी गुरुवारी जिगर, क्रिपेश आणि अभिजित या तिघांना पुन्हा अटक केली. कायदेशीर प्रक्रियेनुसार या तिघांना तुरुंगातून पोलीस ठाण्यात आणल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.