लातूरात शिवाजी चौकातील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटवले

सामना प्रतिनिधी । लातूर

मागील अनेक वर्षांपासून असणारी अतिक्रमणे आज जमिनदोस्त करण्यात आली. सकाळ पासूनच मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करण्यात आली. या मोहिमेमुळे शिवाजी चौकात वाहतूकीची कोंडी होत होती. अतिमक्रमण हटाव मोहिमेमुळे मात्र सर्वसामान्य नागरीकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते.

महानगर पालिकेच्या वतीने अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात सुचना देण्यात आलेल्या होत्या. आज शनिवारची सुट्टी होती, सकाळी सहा वाजल्यापासूनच अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करण्यात आलेली होती. महानगर पालिका आयुक्तांसह अन्य अधिकारी, कर्मचारी, मोठा पोलीस फौजफाटा यासाठी परिश्रम घेत असल्याचे दिसून येत होते. शिवाजी चौक, जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रेल्वे लाईनच्या रस्त्यावरील दुकाने, तहसील कार्यालयाजवळील अतिक्रमणे हटवण्यात आली. दुकानाच्या समोर आलेले पत्र्यांचे शेड उध्दवस्त करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली.

अतिक्रमण हटाव मोहिम राबवत असताना कुणीच विरोध केला नाही. शहरात सर्वच रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात यावीत अशी मागणी सतत लातूरकरांकडून करण्यात येत होती. परंतू प्रशासन केवळ अतिक्रमण काढण्याचा देखावा करतात पुन्हा अतिक्रमणे जशीच्या तशी निर्माण होतात ही लातूरकरांची भावना आजही कायम आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.