रिझर्व्ह बँक मार्चअखेर जिल्हा बँकांकडील जुन्या नोटा घेणार, नाबार्डच्या तपासणीत त्रुटी आढळल्या नाहीत

सामना ऑनलाईन, मुंबई

नोटाबंदीनंतर पहिल्या तीन दिवसांत राज्यातील जिल्हा बँकांकडे जुन्या नोटांच्या माध्यमातून सुमारे पाच हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. सध्या बँकांमध्येच पडून असलेली ही रक्कम कोणत्या खात्यात जमा झाली, त्याची केवायसी पूर्ण आहे का, याची सखोल तपासणी नाबार्डने केली असून त्यामध्ये कोणत्याही त्रुटी आढळलेल्या नाहीत. त्याचा अहवाल नाबार्डने पंधरा दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेला सादर केला आहे. त्यामुळे मार्चअखेर जिल्हा बँकांकडे असलेल्या जुन्या नोटा आरबीआय स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या नोटा जमा करून घेण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिल्याने हा पैसा जिल्हा बँकांसाठी ओझे ठरू लागला आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा बँकांची केवायसी तपासून पैसे जमा करून घेऊ, असे रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार नाबार्डच्या पुणे विभागाने जिल्हा बँकांची तपासणी केली असून केवायसीचीही तपासणी पूर्ण करून त्याचा अहवाल दिला आहे. या तपासणीत कोणत्याच जिल्हा बँकेच्या दप्तरात त्रुटी आढळलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वच जिल्हा बँका समाधान व्यक्त करत असून मार्चअखेर ही रक्कम रिझर्व्ह बँक स्वीकारणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिवसाला व्याजापोटी मोजाव्या लागत असलेल्या ५४ लाखांच्या जाचातून बँकांची सुटका होण्याची शक्यता आहे.

नाबार्डने जिल्हा बँकांचे दप्तर आणि केवायसीची तपासणी केली आहे. त्यामध्ये त्रुटी आढळलेल्या नाहीत. आरबीआयने तत्काळ जुन्या नोटा स्वीकारून व्याजाच्या जाचातून जिल्हा बँकांची मुक्तता करावी.
दिलीप पाटील, अध्यक्ष – सांगली जिल्हा बँक