‘द शेप ऑफ वॉटर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

सामना ऑनलाईन । कॅलिफोनिया

जगभरातील चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ९०व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘द शेप ऑफ वॉटर’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. सर्वाधिक म्हणजे १३ विविध विभागांत नामांकन मिळालेल्या या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिजाईन या चार विभागांत पुरस्कार पटकावला आहे. ‘थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिसौरी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी फ्रान्सिस मॅकडोर्मंड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली तर ‘द डार्केस्ट अवर’साठी गॅरी ओल्डमन सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला.

लॉस एंजलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्करचा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा पार पडला. ऑस्करमध्ये यंदा बाजी कोण मारणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अभिनेता जिम्मी किमेल यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या शर्यतीत ‘कॉल मी बाय युवर नेम’, ‘डार्केस्ट अवर’, ‘डंकर्क’, ‘गेट आऊट’, ‘लेडी बर्ड’, ‘फॅन्टम थ्रेड’, ‘द पोस्ट’, ‘थ्री बिलबोर्ड’, ‘आऊटसाईड एबिंग मिसौरी’ हे चित्रपट होते. मात्र ‘द शेप ऑफ वॉटर’ने यात बाजी मारली. त्यापाठोपाठ ‘डंकर्क’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट संकलन, ध्वनिमिश्रण आणि ध्वनिसंकलन अशा तीन पुरस्कारांवर मोहोर उमटवली. सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचा मान चिली देशाच्या ‘अ फँटॅस्टिक वुमन’ या चित्रपटाने पटकावला.

१४ वर्षांचा वनवास संपला

सिनेमॅटोग्राफर रॉजर डेकिन्स यांना आजवर १३ वेळा ऑस्करने हुलकावणी दिली. मात्र यंदा ‘ब्लेड रनर २०४९’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा त्यांना पुरस्कार मिळाला. अन् त्यांचा १४ वर्षांचा वनवास संपला.

पुरस्कारांची यादी –

सर्वोत्कृष्ट चित्रपट – द शेप ऑफ वॉटर,
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – फ्रान्सिस मॅकडोर्मंड
(‘थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिसौरी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – गॅरी ओल्डमन (द डार्केस्ट अवर)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग – रिमेम्बर मी (कोको)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर – द शेप ऑफ कॉटर
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – ब्लेड रनर २०४९
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – गेट आऊट
सर्वोत्कृष्ट पटकथा – कॉल मी बाय युअर नेम
सर्वोत्कृष्ट लाईक्ह ऍक्शन (शॉर्ट) – द सायलेंट चाईल्ड
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म- हेकन इज अ ट्राफिक जॅम ऑन द ४०५
सर्वोत्कृष्ट संकलन – डंकर्क
सर्वोत्कृष्ट क्हिज्युअल इफेक्टस् – ब्लेड रनर २०४९
सर्वोत्कृष्ट ऑनिमेटेड फिचर – कोको
सर्वोत्कृष्ट ऑनिमेटेड शॉर्टफिल्म – डिअर बास्केटबॉल
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – ऑलिसन जेनी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सॅम रॉककेल
सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट – अ फँटॅस्टिक कुमन (चिली)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – द शेप ऑफ कॉटर
सर्वोत्कृष्ट ध्कनिसंकलन, ध्वनिमिश्रण – डंकर्क
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री (फिचर) – इकरस
सर्वोत्कृष्ट केशभूषा – फॅन्टम थ्रेड
सर्वोत्कृष्ट रंगभूषा, केशभूषा – डार्केस्ट अवर

शशी कपूर, श्रीदेवीला श्रद्धांजली

ऑस्कर सोहळ्यात अभिनेत्री श्रीदेवी आणि ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे फोटो दाखवून त्यांना मानवंदना देण्यात आली. शशी कपूर यांनी हॉलीवूडच्या ‘द हाऊसहोल्डर’, ‘शेक्सपिअर वल्लाह’, ‘द गुरू’, ‘बॉम्बे टॉकीज’या चित्रपटांत काम केले आहे.

लैंगिक शोषण, गन कल्चरला विरोध

रेड कार्पेटवर येताना कलाकारांनी आपल्या पोषाखावर भगव्या रंगाचा पीन कोटला लावला होता. अमेरिकेतील ‘गन कल्चर’विरोधात आवाज उठवण्यासाठी हा पीन कोटवर लावण्यात आला होता. फ्लोरिडा पार्कलँड येथील एका माजी विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर हा पीन लावण्यात आला होता. याशिवाय ‘टाइम्स अप’ म्हणत हॉलीवूड कलाकारांनी लैंगिक शोषणाविरोधात आवाजही उठवला.

डॅनिएल हिला मिळाला प्रेझेंटरचा मान

९०व्या ऑस्कर सोहळ्यात एक आकर्षण ठरले ते म्हणजे ट्रान्सजेंडर असलेल्या डॅनिएला केगाने प्रेझेंटर म्हणून काम केले. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर क्यक्तीला विशिष्ट कामगिरीसाठी नेमण्यात आले होते. ‘अ फँटास्टिक कूमन’ या चित्रपटासाठी डॅनिएला यांनी मुख्य भूमिका केली आहे.

…म्हणून प्रियांका राहिली ‘ऑस्कर’पासून दूर

बॉलीवूडसह हॉलीवूड गाजवणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा ऑस्कर सोहळ्यात सहभागी झाली नाही. ‘मी आजारी असल्याने ऑस्करमध्ये सहभागी होऊ शकत नाही. ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या सर्व मित्रांना शुभेच्छा’ अशी पोस्ट प्रियांकाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.