राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप उमटवणाऱ्या ‘द सायलेन्स’चा ट्रेलर प्रदर्शित

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट नगरीत आपली छाप उमटवलेल्या ‘द सायलेन्स’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाने इफ्फी, बंगळुरू, मुंबई, पुणे आणि कोलकातासह जर्मनी, अमेरिका, ब्राझील, स्पेन, टांझानिया, चेक प्रजासत्ताक आणि बांग्लादेशसारख्या ३५ हून अधिक चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावली आहे. तसेच ‘द सायलेन्स’ चित्रपटाने २ महाराष्ट्र राज्य पुरस्कारांबरोबर एकूण १५ पुरस्कारांवर नाव कोरले आहे. हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘द सायलेंस’ एक वास्तवदर्शी चित्रपट आहे. चित्रपट महोत्सवांत “जबरदस्त”, “दुष्प्रवृत्तींविरोधात लढा देण्यास प्रवृत्त करणारा चित्रपट”, “हा चित्रपट पाहताना उर भरून आला होता” अशा अनेक भावुक प्रतिक्रिया मिळवणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत एका दिमाखदार सोहोळ्याद्वारे प्रदर्शित करण्यात आला. या प्रसंगी चित्रपटाच्या निर्मात्या अश्विनी सिधवानी, निर्माते अर्पण भुखनवाला, नवनीत हुल्लड मोरादाबादी आणि अरूण त्यागी, तर सहनिर्माते गौरीश पाठारे आणि सनी खन्ना, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्यासमवेत अंजली पाटील, नागराज मंजुळे, रघुवीर यादव यांसारखे चित्रपटातील नामवंत कलाकार आणि अॅड. पूजा कुटे उपस्थित होत्या.

अॅड. पूजा कुटे यांच्याकडे असणाऱ्या खटल्यावर चित्रपट बनवण्यासाठी कथा-पटकथा लेखन निर्मात्या अश्विनी सिधवानी यांनी केले असून दिग्दर्शन आणि संवाद लेखन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. तर संगीत इंडियन ओशन बँडने दिले आहे. छायाचित्रदिग्दर्शन कृष्णा सोरेन यांनी केले असून संकलन मयुर हरदास यांचे आहे.