डिस्ट्रिब्युटरशिप देण्याच्या नावाखाली महिलेला गंडा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पतंजली आयुर्वेदिक कंपनीचे अधिकारी असल्याची बतावणी करून तिघा भामटय़ांनी एका महिलेला डिस्ट्रिब्युटरशिप देण्याच्या नावाखाली दोन लाखांचा चुना लावल्याची घटना घाटकोपर येथे घडली. इंटरनेटच्या माध्यमातून खोटी माहिती देऊन त्या तिघांनी मोनिका धरोड यांची फसवणूक केली म्हणून साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

घाटकोपरच्या सुभाष नगरात राहणाऱया मोनिका धरोड (४२) या इंटरनेटवर पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड कंपनीच्या डिस्ट्रिब्युटरशिपबाबत माहिती घेत होत्या. त्यावेळी त्या पाहत असलेल्या पतंजलीच्या साइटवर त्यांना संपर्कासाठी देण्यात आलेले दोन मोबाईल नंबर दिसले. त्यामुळे मोनिका यांनी त्या मोबाईल नंबरवर संपर्प साधून डिस्ट्रिब्युटरशिपबाबत विचारणा केली. त्यावेळी एका भामटय़ाने मोनिका यांना व्हॉटस्ऍपवर एक कंपनीचा फॉर्म पाठवला. तो फॉर्म भरून द्या म्हणजे तुम्हाला डिस्ट्रिब्युटरशिप देण्याची प्रोसेस सुरू होईल असे मोनिका यांना सांगण्यात आले. शिवाय त्या फॉर्मचे दहा हजार रुपयेदेखील घेण्यात आले. त्यानंतर पतंजली कंपनीचे काही प्रोडक्ट आणि डिस्ट्रिब्युटरशिप मिळविण्यासाठी दोन लाखांची मागणी त्या भामटय़ांनी केली. त्यानुसार मोनिका यांनी दोन लाख रुपयेदेखील आरोपींनी सांगितल्याप्रमाणे दिले. एनएफटीद्वारे हे पैसे घेण्यात आले.

पैसे मिळताच टाळाटाळ सुरू
मोनिका यांनी २ लाख १० हजार रुपये दिल्यानंतर आरोपींनी त्यांना टाळण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे समजताच मोनिका यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. साकीनाका पोलीस त्या तिघांचा शोध घेत आहेत. पतंजलीच्या नावाने याआधीदेखील अशा प्रकारे दोघांची फसवणूक झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.