निफाडमध्ये महिनाभरात तिसऱ्यांदा बिबट्या जेरबंद

सामना प्रतिनिधी । नाशिक

निफाड तालुक्यातील महाजनपूर शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी पहाटे सहा वर्षे वयाचा नर बिबट्या जेरबंद झाला. महिनाभरात या ठिकाणी तिसरा बिबट्या जेरबंद झाला आहे.

महाजनपूर येथील शिवाजी दराडे यांच्या शेतात हा पिंजरा लावला असून, यापूर्वी 13 ऑगस्टला एक मादी तेथे जेरबंद झाली. त्यानंतर दोनच दिवसात साडेचार वर्षे वयाचा नर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. आज बुधवारी पहाटे त्याच ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात सहा वर्षे वयाचा नर बिबट्या आढळून आला. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनसेवक भय्या शेख व पथकाने त्याला निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत आणले. महिनाभरातील ही तिसरी घटना असून, धास्तावलेल्या ग्रामस्थांनी त्याच ठिकाणी पिंजरा कायम ठेवण्याची मागणी केली आहे.