कराड शहरातील अन्यायकारक कर आकारणी रद्द करावी – सौरभ पाटील

1

सामना प्रतिनिधी । कराड

कराड शहरातील कर आकारणीसाठी केलेली झोनपद्धत चुकीच्या आहे ती रद्द करावी, फेर मूल्यांकन करावे, विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करून नव्या पद्धतीने कर आकारणीसाठी निर्णय व्हावा, अन्यथा लोकशाही आघाडीच्यावतीने आंदोलन केले जाईल आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे याबाबत न्याय मागितला जाईल अशी मागणी लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

कराड नगरपालिकेतील लोकशाही आघाडीच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सौरभ पाटील बोलत होते. यावेळी नगरसेवक वैभव हिंगमिरे’ मोहसिन आंबेकरी, नगरसेविका अनिता पवार, सुनंदा शिंदे, शिवाजी पवार, सुहास पवार उपस्थित होते.

कराड नगरपालिकेने कर आकारणी करण्यासाठी झोन पद्धत अंगीकारली होती दरम्यान ही झोन पद्धत चुकीची व अन्यायकारक आहे. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना याबाबतचे निवेदन देऊन आम्ही या प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. कराडच्या जनतेने आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यांची कामे करण्यासाठी आम्ही नगरपालिकेत आलो अाहोत, नागरिकांच्या मिळकतीवर शंभर ते दीडशे टक्के जादा कर आकारणी करण्यात आली आहे. हा नागरिकांच्यावर अन्याय आहे. यामुळे सध्या वाटण्यात येणारे कर आकारणीची बिले वाटू नये. अशी लोकशाही आघाडीची भूमिका आहे. याविरोधात आम्ही पाऊल उचलले आहे. याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे न्याय मागितला जाईल. आंदोलनही केले जाईल असा इशाराही नगरसेवक सौरभ पाटील यांनी दिला आहे.

झोन एक म्हणजे कराडमधील मुख्य बाजारपेठेचा भाग, या ठिकाणी घरगुती कर आकारणी 662 रुपये तर वाणिज्य कर आकारणी 522 रुपये अशी केले आहे. आणि कराडमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागामध्ये सर्वसकट घर आकारणी 406 रुपये तर वाणिज्य कर आकारणी 812 रुपये करणेत आले आहेत. कराड शहर व कराड ग्रामीणमधील कर आकारणीचे दर पाहता यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्याचबरोबर कराडमधील शिवाजी हाऊसिंग सोसायटीमधील घरगुती कर आकाकारणी 256 रुपये तर वाणिज्य कर आकारणी 511 रुपये अशी आहे. तीन झोनमधील कर आकारणी पाहता प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा कमी अधिक प्रमाणात व अन्यायकारक पद्धतीने कर आकारणी केल्याचे दिसून येत आहे. असेही नगरसेवक सौरभ पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.

कराड नगरपालिकेचे प्रशासन प्रमुख म्हणून मुख्याधिकाऱयांशी याबाबत चर्चा झाली. दरम्यान त्यांनी याबाबत अपिल दाखल करण्याची सूचना केली आहे. वास्तविक पाहता कर वाढ अन्यायकारक असताना अपिल दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही. ही अन्यायकारक करवाढ रद्द करावी अशीच आमची लोकशाही आघाडीच्यावतीने मागणी आहे. अपिलाची सुनावणी करताना प्रत्येकाचे स्वतंत्रपणे सुनावणी होत नाही. सामूहिक सर्वसमान निर्णय घेवुन 10 ते 15 टक्के करवाढीचा घेतला जातो. अपिल धारकाला समान न्याय मिळत नाही. ज्यांची शंभर, दीडशे टक्के कर वाढ झाली आहे अशा करदात्यांच्यावर मोठ्या प्रमाणात यामुळे अन्याय होतो. असे सांगून नगरसेवक सौरभ पाटील म्हणाले कराडमध्ये 16 हजार मिळकतदार आहेत. कर आकारणीचे बिल मिळालेले आहे अशा 450 मिळकतदारांनी अपिल दाखल केले आहेत.

लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासन अथवा सत्ताधाऱयांनी आम्हाला विश्वासात घेतलेले नाही. कर आकारणी संबंधी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी, कर आकारणीचे बिले वाटप त्वरित थांबवावीत, झोन पद्धत बदलावी व त्यांची पुनर्रचना करावी, फेरमूल्यांकन करून नवीन कर आकारणी बिल तयार करावीत, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे याबाबत न्याय मागितला जाईल. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही नगरसेवक सौरभ पाटील यांनी यावेळी दिला आहे.