शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आचरा ग्रामस्थांचा वीज अधिकाऱ्यांना घेराव

1
आचरा परिसरातील वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारताना शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे.

सामना प्रतिनिधी, मालवण

आचरा, चिंदर, त्रिंबक व वायंगणी भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. खंडित वीज पुरावठ्यामुळे त्रस्त बनलेल्या आचरा विभागातील ग्रामस्थांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आचरा वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता दिपक बुगडे यांना घेराव घालत धारेवर धरले.

दरम्यान, वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आचरा व्यापारी त्रस्त झाले असुन शिवसेनेपाठोपाठ आचरा व्यापाऱ्यानीही वीज वितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत स्वतंत्र विद्युत वाहिनीची मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी आचरा तिठा ते बाजारपेठसाठी स्वंतंत्र वीज वाहिनी देण्याचे आश्वासन दिले आहे.

गेले काही दिवस आचरा गावासह चिंदर, त्रिंबक, वायंगणी भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या पार्शवभूमीवर आचरा शिवसेनेने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरले. यावेळी आचरा भागासाठी वीज वितरणचे कार्यालय असुनही आचरा पंचक्रोशीतील विजेच्या समस्या कमी होत नसल्याने आचरा विभागातील शिवसैनिकांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. यावेळी आचरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, आचरा पोलीस, नारायण कुबल, शाम घाडी, सतीश प्रभू, दिलीप पराडकर, समीर लब्दे, राजू नार्वेकर, नितीन घाडी व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

रात्रीच्या वेळेत वीज गायब होण्याचा प्रकार वाढत चालला असुन याबाबत वीज कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनी केला असता तो भ्रमणध्वनी बंद असतो. वीज पुरवठा सुरळीत करा अशी मागणी केल्यानंतर बुगडे यानी आठ वायरमन व पाच इतर कर्मचारी असुन आज १३ जणांची टीम कार्यरत असुन लवकरच असलेल्या अडचणी दुर करण्याचे आश्वासन दिले.

आचरा व्यापारीही आक्रमक
वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याने आचरा व्यापारीही त्रस्त झाले होते. आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष अभिजित सावंत, जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडीस, बाबु परुळेकर, संदीप पांगम, मनोहर वाडेकर, गिरीश माटवकर व अन्य व्यापारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आचरा व्यापाऱ्यांनी स्वतंत्र विद्युत वाहिनी आचरा बाजारपेठ परिसरात देण्याची मागणी केली. यावेळी वीज वितरणकडून आचरा तिठा ते बाजारपेठसाठी स्वतंत्र विद्युत वाहिनी देण्याचे वीज वितरण कडून मान्य करण्यात आहे.