हिंदुस्थानातील १०० श्रीमंतांची संपत्ती ३१ लाख कोटी रुपयांनी वाढली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंमलबजावणीचा जोरदार फटका हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेसह सामान्य माणसाला बसला तरी देशातील श्रीमंतांच्या कमाईवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. याउलट हिंदुस्थानातील १०० श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल ३१ लाख कोटी रुपयांनी (४७९ अब्ज डॉलर्स) वाढ झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची संपत्ती ३८ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे २.५ लाख कोटी रुपये) झाली असून त्यांनी गेली दहा वर्षे श्रीमंतांच्या यादीतील पहिले स्थान कायम राखले आहे. प्रख्यात ‘फोर्ब्स’ मासिकाने २०१७ ची हिंदुस्थानातील १०० श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात ६७ टक्के वाढ झाली असून त्यांच्या संपत्तीत १५.३ अब्ज डॉलर्सनी वाढ झाली आहे.