चिनी मांज्यामुळे महिलेचा गळा कापला

सामना प्रतिनिधी, पुणे

बंदी असलेल्या नायलॉन चिनी मांज्याचा सर्रास वापर सुरू असल्याने यामध्ये दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी होऊन त्यांचा गळा कापल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी शिवाजी पुलावर घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सुवर्णा मनोहर मुजूमदार (वय ४६, रा. सिंहगड रस्ता) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मनोज उल्हास शेटे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा मुजूमदार यांचे शनिवारवाड्याजवळ कार्यालय आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास त्या दुचाकीवरून त्या साखर संकुलजवळ असलेल्या त्यांच्याच कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयात जात होत्या. शिवाजी पुलावर त्या आल्यानंतर त्यांच्या गळ्याला नायलॉनचा चिनी मांज्या अडकला. त्यामुळे त्यांचा गळा कापला गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित त्यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिली.

नायलॉनच्या मांज्यामुळे गंभीर दुखापत होत असून, यामुळे अनेकांचा जीवही गेला आहे. या मांज्यावर बंदी असूनही त्याचा सर्रास वापर होत आहे. पुणे महापालिकेसह पोलिसांकडूनही विक्रेत्यांवर कारवाई केली जात नसल्याने मांज्या विक्रेत्यांना अभय मिळत आहे.