‘हिंदू’ शब्द मुघलांच्या आधी अस्तित्त्वातच नव्हता; कमल हसन यांचे वादग्रस्त विधान

सामना ऑनलाईन । चेन्नई

मुघल आणि परकीय आक्रमणाआधी हिंदू हा शब्द अस्तित्त्वातच नव्हता असे वादग्रस्त वक्तव्य मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष, अभिनेते कमल हसन यांनी केले आहे. कमल हसन पुन्हा एकदा बरळल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असे वक्तव्य कमल हसन यांनी नुकतेच केले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर कमल हसन यांनी प्रत्येक धर्मात दहशतवादी असल्याचे वक्तव्य करून वादात आणखी भर घातली होती. आता त्यांनी हिंदू हा शब्द मुघल आणि परकीय आक्रमणाआधी अस्तित्त्वातच नव्हता असे वक्तव्य करून आगीत तेल ओतले आहे.

कमल हसन यांनी तामिळ भाषेत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हिंदू या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन धर्मग्रंथात आढळत नाही असे म्हटले आहे. हिंदू हा शब्द परदेशी आक्रमकांनी आणि मुघलांनी दिला आहे. परकीयांनी दिलेली ही ओळख जपण्यापेक्षा आपण भारतीय ही ओळख जपली पाहिजे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हिंदू हा शब्द धर्मासाठी वापरणे अयोग्य आहे, आपण सगळे भारतीय आहोत. आपली ओळख भारतीयच असली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. शैव, वैष्णव किंवा शाक्त पंथीयांच्या ग्रंथात किंवा इतर प्राचीन धर्मग्रंथांत कुणीही हिंदू या शब्दाचा उल्लेख आढळत नाही. मुघल आणि परकीय आक्रमणाआधी हा शब्दच अस्तित्त्वात नव्हता. ब्रिटिशांच्या राजवटीत त्यांनी हिंदू हा शब्द प्रचलित केला असेही त्यांनी म्हटले आहे. नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता असे म्हणणाऱ्या कमल हसन यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती. हा वाद शांत होत नाही तोच त्यांनी प्रत्येक धर्मात दहशतवादी असल्याचे विधान केले होते. आता हिंदू हा शब्द परकीय आक्रमणापूर्वी अस्तित्वातच नव्हता असे विधान करत त्यांनी वादात आणखी भर घातली आहे. आपली ओळख भारतीय अशीच ठेवली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे, त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.