अल्पवयीन बालिकेला त्रास देणाऱ्या युवकाला सक्तमजुरी

1

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड रेल्वे डिव्हीजन कार्यालयाच्या जवळपास असलेल्या एका वस्तीत एका अल्पवयीन बालिकेला नेहमी त्रास देणाऱ्या युवकाला पाचव्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिल्पा तोडकर यांनी सहा महिने सक्तमजुरी आणि अडीच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

एका 16 वर्षीय बालिकेने पोलीस ठाणे विमानतळ येथे दि.2 ऑगस्ट २०१६ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार सोपान सिध्दार्थ खिल्लारे (२२) याने 28 जुलै 2016 रोजी दुपारी चार वाजता तिच्या समोर मोटारसायकल आडवी उभी करुन तिचा विनयभंग केला, अशी तक्रार दिली होती. विमानतळ पोलिसांनी सोपान खिल्लारे विरुध्द गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक सविता खर्जुले यांनी सोपान खिल्लारेविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात या प्रकरणी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. उपलब्ध पुराव्याआधारे न्या.शिल्पा तोडकर यांनी सोपान सिध्दार्थ खिल्लारेला अल्पवयीन बालिकेचा केलेल्या विनयभंगासाठी दोषी मानले आणि त्यास अडीच हजार रुपये रोख दंड आणि सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

या खटल्यात सरकार पक्षाची बाजू अ‍ॅड.यादव तळेगावकर यांनी मांडली. आरोपी सोपान खिल्लारेच्या वतीने अ‍ॅड.शिवराज पाटील यांनी काम पाहिले. विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अरुण जोंधळे यांनी या प्रकरणात तपास अधिकाऱ्याची भूमिका बजावली. त्यांना पोलीस कर्मचारी रामदास सूर्यवंशी यांनी मदत केली.