‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले

aamir-khan-thugs-of-hindost

सामना ऑनलाईन,मुंबई

बिग बी आणि आमिर खानसारखी तगडी स्टारकास्ट असूनही बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले आहे. यशराज बॅनरखाली बनलेल्या या बिग बजेट चित्रपटामुळे दिवाळीत थिएटर्स गर्दीने फुलून जातील अशी शक्यता होती; पण हा चित्रपट तिकीटबारीवर न चालल्याने दिवाळीतच थिएटर मालकांचे दिवाळे निघाले असून त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

विजय कृष्ण आचार्य यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 275 कोटी रुपये खर्च झाले मात्र पहिल्या दहा दिवसांत बॉक्स ऑफिसवर केवळ 143 कोटी रुपयांचीच कमाई हा चित्रपट करू शकला. त्यामुळे थिएटर मालक सध्या तोटा सहन करीत आहेत. या चित्रपटाचा टिजर आला त्याचवेळी सोशल मीडियावर प्रेक्षकांनी चित्रपटाची खिल्ली उडवली. काहींनी तर बिग बी आणि आमिरवर मीम्सही तयार केले.

यशराजचे वितरक मात्र फायद्यात

‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने अनेकांच्या खिशाला कात्री लावली असली तरी या चित्रपटामुळे यशराज फिल्म्सचे वितरक मात्र फायद्यात आहेत. वितरक आपल्या पॉलिसीद्वारे मिळणाऱ्या कमिशनवर चित्रपटाचे वितरण करतात. यशराजचे वितरक ठरलेल्या कमिशनवरच चित्रपट वितरित करतात.