रसिकहो! मॅड मॅड गडबड

क्षितिज झारापकर ,[email protected]

काही माणसं वेडी असतात. याचा अर्थ ती मेडिकली सायकॅटीक असतात असा नाही, तर काही माणसांच्या विचार प्रक्रियेत एक विलक्षण मॅडनेस असतो. अशी माणसं एक तर मुख्य प्रवाहातून बाहेर असतात आणि अज्ञातवासात जगतात,  कारण जग त्यांना समजूच शकत नाही किंवा ती आपल्या वेडसरपणातून जगाला एक वेगळीच दिशा देऊन अजरामर होतात. नाटय़सृष्टीत अशा विलक्षण वेडेपणातून काही अजरामर नाटकं निर्माण झालेली आहेत. अगदी अलीकडची उदाहरणं म्हणजे ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ आणि ‘यदा कदाचित’. हा मॅडनेस खूप रिफ्रेशिंग वाटतो, तेव्हा ते नाटक प्रेक्षक पसंतीला उतरतं. अशीच काहीशी गोष्ट आहे नुकत्याच आलेल्या ‘एपिक गडबड’ या नाटकाची. अभिजीत साटम ज्यांनी ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ची निर्मिती केली होती त्यांनीच पुन्हा हा मॅडनेस प्रस्तुत केलेला आहे. हा मॅडनेस खरा अवतरलाय तो मकरंद देशपांडे या अवलियाच्या डोक्यातून. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’मध्ये कोकणात हिटलर आला होता ‘एपिक गडबड’मध्ये शेक्सपियर येतो. दोन्ही नाटकांमध्ये एक विलक्षण साम्य मात्र आहे. स्लॅपस्टिक शैली. सापडेल त्या मुद्दय़ावर पंच करून पुन्हा मूळ पदावर येऊन पुढे सरकण्याची अफलातून किमया या दोन्ही नाटकांचा गाभा आहे. ‘एपिक गडबड’मध्ये तर नाटकात नाटक आहे. त्यामुळे हा बाज चपखल बसला आहे. हा बाज अंगीकारताना एखाद्या कलाकाराच्या बाजूने झुकून एककल्लीपणा संभवतो. तसा एककल्लीपणा ‘एपिक गडबड’मध्ये कुठेही जाणवत नाही. ते नसल्यामुळे नाटक एकसुरीसुद्धा होत नाही. हे ‘एपिक गडबड’ या नाटकाचं यश आहे.

मकरंद देशपांडे यांनी ‘एपिक गडबड’ खूप हुशारीने बेतलं आहे. नाटक लिखाणातच गतिमान असलं की सादरीकरणात फसण्याचे चान्सेस खूप कमी असतात. ‘एपिक गडबड’ अत्यंत गतिमान आहे. एका नाटकात एका मुलीचं लग्न ठरत असतं आणि तिच्या अटींप्रमाणे नवरा मुलगा शोधला जातोय. अचानक या परिस्थितीत विल्यम शेक्सपियर तिथे अवतरतो आणि मग सगळी गडबड सुरू होते. आता मुळात गंमत ही आहे की, नाटकातल्या नाटकातलीही बाकी सगळी पात्रं खरी आहेत, फक्त हे विल्यम शेक्सपियरचं पात्र काल्पनिक आहे. म्हणजे मामा, आई, नवरी, बाब्या आणि नवरीच्या हट्टापायी तिला बघायला पेशवाई थाटात येणारा नवरा ही सगळी खरी पात्रे आहेत, पण सरंजामी विलायतेतून अवतरणारा विल्यम शेक्सपियर यांच्यात काल्पनिक आहे. हा मॅडनेस मकरंद देशपांडे यांनी खूप हुशारीने हाताळून ‘एपिक गडबड’मध्ये मांडलेला आहे. नवरी तडफदार विल्यमच्या प्रेमात पडते. इथून गडबड सुरू होते. आता प्रश्न असा आहे की, शेक्सपियरच्या येण्याला लॉजिक काय? तर मकरंदने तेही योग्यपणे योजलं आहे. ‘एपिक गडबड’ हे मकरंद देशपांडे यांचं नाटक आहे. म्हणून इथे शेक्सपियर जाब विचारायला आला आहे. मागे कधीतरी मकरंदने शेक्सपियरची एक ट्रजिडी फार्सच्या बाजात सादर केली होती. याची सल मनात घेऊन शेक्सपियर आला आहे. या एका मुद्याने हे नाटक लेखकाच्या संदर्भात आत्मकेंद्रित होऊन जातं, ज्याची मराठी प्रेक्षकाला सवय नाही. ‘एपिक गडबड’च्या दिग्दर्शनात मकरंद देशपांडे यांनी अत्यंत शिस्तबद्ध स्ट्रक्चर उभारलंय. मकरंद देशपांडे यांचं कंपोजिशनचं स्टेजक्राफ्ट सुंदर आहे. एका लयीत सगळी हालचाल होत राहते आणि आपण दर्शक अलगद सगळं फॉलो करत राहतो.

‘एपिक गडबड’ची मुख्य जमेची बाजू त्यातील कलाकारांचा संच आहे. प्रत्येक कलाकार नेमून दिलेलं काम चोख बजावतो. निनाद लिमये याने विल्यम शेक्सपियर अत्यंत दिमाखदार सादर केलाय. नितीन देसाई यांच्या ‘छत्रपती शिवाजी’ मालिकेतील पौगंडावस्थेतला शिवाजी थेट विल्यम शेक्सपियर होतो ही खरी एपिक गडबड आहे. निनादने ब्रिटिश इंग्लिश आणि त्यातही शेक्सपियरन काळातलं इंग्रजी परफेक्ट लेहजानिशी सादर केलंय. हे खूपच भावतं. आकांक्षा गाडे हिने लग्नबंबाळ नवरी कमालीच्या लवचिकतेने साकारली आहे. काही प्रसंगांमध्ये आकांक्षाची इन्टेन्सिटी वाखाणण्याजोगी आहे. माधुरी गवळी आणि अजय कांबळे हे दोघे ‘एपिक गडबड’चे युएसपी आहेत. या दोघांचा अफाट टायमिंग सेन्स आणि बॉडी लॅग्वेज नाटकाला खऱया अर्थाने एपिक बनवते. संजय दधिच यांनीही आपल्या अभिनयाने नाटक उत्तम रंगवलेले आहे. भरत मोरे आणि तुषार घाडीगावकरदेखील चोख कामगिरी पार पाडतात. रचिता अरोरा यांचं संगीत संहितेला पोषक आणि पूरक असंच आहे. टेड्डी मौर्या यांचं सूचक नेपथ्य छान जमलंय. मकरंद देशपांडे यांच्याच ‘सर सर सरला’ या नाटकात टेड्डीने एक भला मोठा डॅग्गर लोलकासारखा सोडून एक जबरदस्त इम्पॅक्ट दिला होता. तशी कोणतीही क्लृप्ती वा प्रयोग त्यांनी ‘एपिक गडबड’मध्ये केलेला नाही. अमोघ फडके यांची प्रकाशयोजना ‘एपिक गडबड’चा मूड सांभाळणारी आहे.

मुंबईच्या नाटय़क्षितिजावर पृथ्वी नामक एक नाटय़तळ आहे. ‘एपिक गडबड’ची संपूर्ण टीम या तळावरची आहे. नाटकात एका प्रसंगात या तळावरच्या रहिवाशांवर प्रखर भाष्यदेखील केलेलं आहे. पण पृथ्वी ही निखळ थिएटरची कार्यशाळा आहे. तिथे मग्न होऊन थिएटर करणाऱयांचा एक वेगळा ऑटिटय़ूड आणि शिस्त असते. हा ऑटिटय़ूड आणि शिस्त ‘एपिक गडबड’च्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसते. नरेन चव्हाण आणि अभिजीत साटम यांनी हा पृथ्वी तळावरचा मॅडनेस ओळखून मराठी रंगभूमीवर आणला यासाठी त्यांचं कौतुक झालंच पाहिजे.

 नाटक-एपिक गडबड

 सादरकर्ते-नरेन चव्हाण

 प्रस्तुती-अभिजीत साटम

 निर्माती-ऋतुजा चव्हाण

 संगीत-रचिता अरोरा

 नेपथ्य-टेड्डी मौर्या

 प्रकाश-अमोघ फडके

 लेखक, दिग्दर्शक-मकरंद देशपांडे

 कलाकार-माधुरी गवळी, आकांक्षा गाडे, तुषार घाडीगावकर, भरत मोरे, संजय दधिच, अजय कांबळे आणि निनाद लिमये

 दर्जा-***