बाबुराव मस्तानी…सॉल्लीड लोकनाटय़

<<क्षितीज झारापकर>>

मराठी नाटय़शास्त्रात लोकनाटय़ हा एक खूप प्रभावी आणि लोकप्रिय नाटय़प्रकार आहे. मुक्तनाटय़ाचा संरचित आविष्कार. लोकनाटय़ाला स्थलकालाचं बंधन नाही. पात्रांनी रंगमंचावर एक गिरकी घेतली की स्थल आणि काळ बदललं हे सूचित होतं. लोकनाटय़ या अर्थाने अत्यंत लवचिक प्रकार आहे. पण या लवचिकतेमुळेच हा प्रकार खूप कठीण होतो. लोकनाटय़ाला भरघोस कथानक लागत नाही. एखाद्या साध्या मुद्दय़ावर बेतूनही रंजक लोकनाटय़ उभं करता येतं. मुळात हा प्रकार संपूर्णपणे जनमानसाभिमुख असल्याने जास्तीतजास्त ठिकाणी त्याचे प्रयोग व्हावेत म्हणून त्यात नेपथ्य, प्रकाशयोजनेचे सोपस्कार नसतात. लोकनाय़ाची भाषादेखील अधिकांश बोलीभाषा असते. अशावेळी दिग्दर्शकाला आपलं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं मुख्य साधन म्हणजे त्यातले नट आणि कलाकार हेच उरतात. आजवरच्या गाजलेल्या लोकनाटय़ांचा अभ्यास केला तर मातब्बर नावांची मांदियाळीच आढळते. दादा कोंडके, नीळू फुले, राम नगरकर, दादू इंदुरीकर, काळू-बाळू, वसंत बापट, वसंत सबनीस, लीलाधर हेगडे ही नावं मराठी नाटय़क्षेत्रातील अग्रगण्य कलाकारांपैकी आहेत. त्याचबरोबर ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘गाढवाचं लग्न’, ‘बिन बियांचं झाड’, ‘गाजराची पुंगी’ ही गाजलेली लोकनाटय़े मैलाचे दगड आहेत. आजही या लोकनाटय़ांचे प्रयोग जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे सातत्याने होत असतात. लोकनाटय़ाचा आधुनिक बाज साधारण ८०च्या दशकापासून पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टुरटूर’ या नाटकापासून सुरू झाला. त्यानंतर हा बाज केदार शिंदे, संतोष पवारसारख्या रंगकर्मींनी पुढे चालू ठेवला.

आज शुद्ध लोकनाटय़ व्यावसयिक रंगभूमीवर तसं दुर्मिळ झालंय. याचं मुख्य कारण आज मराठी रंगभूमी तांत्रिकदृष्टय़ा समृध्द होतेय आणि म्हणूनच टेक्निकल भपक्याकडे तिचा कल अधिक होऊ लागलाय. पूर्वी गावात लोकनाटय़ सादर करायला मंडळी आली की मार्केटिंगकरिता पूर्व जाहिरातही नसायची. गावाच्या वेशीवर किंवा चावडीवर ऑर्गन, ढोलकी आणि तुणतुण्याच्या सुर-तालांवर पोवाडे आणि गीतं सादर करून गर्दी जमवली जायची आणि खेळाला सुरुवात व्हायची. आज धंद्याच्या आणि सादरीकरणाच्या विस्तृत गणितांमध्ये हा साधेपणा कुठेतरी हरवलाय. पण सध्या एक नवं कोरं, करकरीत लोकनाटय़ मराठी रंगभूमीवर गाजतंय. ऋणानुबंध कला आविष्कार निर्मित आणि बबन गायकवाड लिखित ‘बाबूराव मस्तानी’ हे ते लोकनाटय़. ‘बाबूराव मस्तानी’ हे गाजतंय. कारण ते सर्व बाबतीतील एक बेसिक लोकनाटय़ म्हणून सादर होतं.

संजय कसबेकरांनी या नाटकांचं दिग्दर्शन करताना कोणताही अतिरिक्त आव न आणता ते सादर केलंय. हल्ली जसं नाटकांचं क्राफ्टिंग करतात तसं न करता संजयने ‘बाबूराव मस्तानी’ हे अत्यंत प्रामाणिकपणे एक लोकनाटय़ म्हणूनच प्रेक्षकांसमोर मांडलंय आणि त्यातच ‘बाबूराव मस्तानी’ या नाटकाचं यश आहे. गणाने सुरू होऊन वगाच्या दिशेने सरकत सरकत ‘बाबूराव मस्तानी’ शेवटाकडे फारच स्मूथली जातं. कोणतंही लोकनाटय़ हे त्यातील सभोवतालच्या सद्यःपरिस्थितीवरील मार्मिक विनोदांवर अवलंबून असतं. त्यातील वगाचा मतितार्थ प्रक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वापरलेले पंचेस हे एक फोकस्ड माध्यम असतं. दादा कोंडके आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यात पारंगत होते. संजय कसबेकरांच्या ‘बाबूराव मस्तानी’मध्ये हे आपल्याला अक्षरशः क्षणोक्षणी जाणवत राहतं.

कोणत्याही लोकनाटय़ाचा भार हा त्यातील सोंगाडय़ा आणि सूत्रधार या जोडीच्या खांद्यावर असतो. तसा तो इथेही आबूराव आणि बाबूराव या जोडीवर आहे. सचिन माधव आणि किरण पाटील हे दोन संपूर्णपणे व्यावसायिकदृष्टय़ा नवीन कलाकार ही जबाबदारी आवेषाने आणि ठामपणे पेलतात. या दोघांची एकमेकांमधली केमिस्ट्री आणि ऊर्जा फन्टॅस्टिक आहे. आपल्यापेक्षा समोरच्याला दाद जास्त मिळतेय हे ऍक्सेप्ट करणं हे मराठीपणाचं लक्षण नाही. इथे मात्र हे दोघे हे सांभाळतात म्हणून या दोघांचं विशेष कौतुक करायलाच हवं. दाद मिळवणाऱयापेक्षा सांभाळणाऱयाचं कणभर जास्तच… पण संपूर्ण नाटकात कुठचा कोण हे ठरवणं कठीण होतं. कारण हे दोघे या भूमिका क्षणोक्षणी बदलत राहतात. म्हणूनच या दोघांबाबत वेगवेगळं लिहिणं शक्यच नाही. एकत्रच लिहिलं पाहिजे. पूर्वी लोकनाटय़े गावच्या चावडीवर होत असल्याने आणि सरकारचे रात्रीचे आवाजावर निर्बंध नसल्याने तेव्हा वेळेचं बंधन नसायचं. त्यामुळे खेळ रंगायचा आणि वाढायचा. यासाठी सूत्रधार-सोंगाडय़ाची जोडी ही तल्लख बुध्दीची आणि हजरजबाबी असण्याची गरज असते. ‘बाबूराव मस्तानी’मधली ही जोडीही तशीच आहे. प्रयोगादरम्यान सुचत जाणारे मुद्दे ते बिनबोभाट मांडत जातात आणि नाटकाचा वेळ क़्टांळवाणा न होता वाढत जातो. हल्ली प्रयोग थिएटरमध्ये होत असल्याने थिएटर कर्मचारी वैतागतात. विंगेतून मग खुणा सुरू होतात आणि ‘आवरा आता’ असं सांगितलं जातं. या सगळ्याचं भान ठेवावं लागतं. पण जिथे हे सगळं सांभाळावं लागतं ते लोकनाटय़ सोलिड असतं. ‘बाबूराव मस्तानी’ एक हे असंच सोल्लीड लोकनाटय़ त्यातील सूत्रधार-सोंगाडय़ाच्या जोडीमुळे झालंय. यात राजा झालेले यशवंत रामचंद्र शिंदे आणि डान्स मास्तर झालेले राजू नाक्ती हेदेखील या दोघांना यथायोग्य साथ देतात. मस्तानी झालेल्या प्रतिमा शिंपी आणि राणी सादर करणाऱया सुप्रिया गावकर यांनीही यथायोग्य कामगिरी केलेली आहे. प्रधानजी नितीन घाणेकरांनीही छोटय़ा भूमिकेतही चमक दाखवली आहे. या लोकनाटय़ाचे आजवर ९२ प्रयोग झालेत. हे श्रेय संपूर्णपणे निर्मात्या चारुशिला ठोसर आणि त्यांचे पती अनिल ठोसर यांचं आहे. मराठी रंगभूमीच्या सध्याच्या स्टारबेस्ड पर्वात त्यांनी एकही नावजलेला कलाकार न घेता केवळ गुणी कलाकारांच्या संचात ‘बाबूराव मस्तानी’ हे लोकनाटय़ करण्याचं धाडस केलं हे कौतुकास्पद आहे.

 • दर्जा- ***
 • नाटकबाबुराव मस्तानी
 • निर्मितीऋणानुबंध कला आविष्कार
 • निर्मातीचारूशिला ठोसर
 • निर्मिती प्रमुखअनिल ठोसर
 • लेखकबबन गायकवाड
 • नेपथ्य  –अशोक पालेकर
 • प्रकाश ध्वनीभाई सावंत, सचिन कदम
 • नृत्य दिग्दर्शक संतोष आंब्रे
 • सूत्रधारनितीन नाईक
 • नृत्यकलाकारकविता यादव, श्वेता पवार
 • कलाकारसुप्रिया गावकर, यशवंत शिंदे, सचिन माधव, किरण पाटील आणि प्रतिमा शिंपी