थिएटर ऑलिम्पिक्स महानाटय़ महोत्सव

शिबानी जोशी,[email protected]

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीने आयोजित ‘थिएटर ऑलिम्पिक्स’चे मुंबईत २४ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. नाटय़प्रेमींसाठी ही खरोखरीच मोठी पर्वणी ठरणार आहे.

थिएटर ऑलिम्पिक्स हा जगातील सर्वात मोठा नाटय़महोत्सव मानला जातो. राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने ही नाटय़-पर्वणी होणार आहे. या महोत्सवात ४५० प्रयोग देशातल्या विविध शहरांत होणार असून अंदाजे २५ हजार कलाकार यात सहभागी होणार आहेत. या सर्व नाटकांची निवड नेमकी कशी केली गेली असे विचारता केंद्रे यांनी सांगितले की, देशातून जवळजवळ १ हजार नाटके व परदेशातून १०० नाटके यासाठी आली होती. ४०-५० जणांची समिती नेमली गेली होती त्यांनी २ स्तरावर अतिशय पारदर्शकपणे नाटकांची निवड केली. पहिल्या समितीने ५५० नाटके निवडली आणि त्यानंतर दुसऱया समितीने पुन्हा त्याला चाळणी लावून अंतिम निवड केली, असे केंद्रे म्हणाले. या समितीमध्ये नाटक शिकवणारे, स्कॉलर्स, एक्स्पर्ट, फॉलोअर्स यांचा समावेश होता.

यात लोककला प्रकार सादर होणार आहेत. विद्यार्थ्यांचे आविष्कार होणार आहेत.’ नाटकाच्या घटत्या लोकप्रियतेवर ‘चर्चासत्रही होणार असून त्यात विदेशी नाटककार थॉमस स्टोपर्ड्स, एम. के. रैना, अरुंधती नाग, देव शंकर हल्दर असे दिग्गज सहभागी होणार आहेत. इतर भाषेतील नाटय़ संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी मुख्यत्वे याचे आयोजन केले असून जगभरातील नाटकांच्या विविधतेचे दर्शन घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबईत मराठी नाटके होतच असतात, पण मुंबईकरांना इतर भाषेतील नाटक पाहायला मिळणे दुर्लभ असते. त्यांच्या शहरात आणून नाटय़प्रेमींना समृद्ध करणे महत्त्वाचे मानल्यामुळे मुंबईत मराठी नाटक नसेल, पण इतर महत्त्वाच्या भोपाळ, बंगलोर, इम्फाज, अहमदाबाद, जयपूरसारख्या केंद्रावर चांगली चांगली मराठी नाटके होत आहेत. हे बंध रेशमाचे, देवबाभळी, मौनरान, वानरायण, महानिर्वाण, सुखाशी भांडतो आम्ही अशी अनेक नाटके थेट इम्फाळपर्यंत जाऊन मराठी नाटकाचा झेंडा रोवून येत आहेत. मराठीतील आशयघनता, व्यावसायिकता याच देशात सर्वत्र कौतुक असून मराठी नाटकाना छान प्रतिसादही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. १७ फेब्रुवारीला दिल्लीत झालेल्या उद्घाटनाला गणेशवंदना, आपले मराठी तुतारीवाले, लावणीचा समावेश केला गेला होता आणि आपल्या तुतारीवाल्यांनी लाल किल्ल्याचा सर्व परिसर दणाणून सोडला होता. त्यामुळे समृद्ध अशा मराठी लोककला, नाटक यांची नोंद नक्कीच घेतली गेली असल्याचे ते म्हणाले. खरं तर नाटकाचा खरा मुखिया लेखक असतो असं म्हटलं जातं, पण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात नाटककाराचं नाव दिसत नाही, असं का? असे विचारले असता त्यांनी मी लेखकांच्या बाजूने नेहमीच उभा राहतो. त्यामुळे कोणत्याही उद्देशाने नाव वगळता असे नाही, ती चूक आवश्य सुधारण्यात येईल. लेखकांना त्यांचा हक्क मिळायलाच हवा या मताचा मी आहे, असे ते म्हणाले.

थिएटर ऑलिम्पिक्सची स्थापना १९९३ साली ग्रीस इथे झाली. नाटकाचे विद्यार्थी, तज्ञ, रसिक सर्वांना नाटय़ देवाणघेवाण करता यावी हा त्याचा उद्देश आहे. असे म्हटले जाते की, कोणतीही कला हे एक उत्तम संवादाचं माध्यम आहे. त्यामुळे भाषेचा अडसर नाटक पाहताना न येऊ देता त्याचा आस्वाद घेता यावा हा उद्देशही यामागे आहे. आतापर्यंत १९९९ ला जपानमध्ये, २००१ ला रशियामध्ये, २००६ ला तुर्की, २०१० ला दक्षिण कोरिया, २०१४ला चीनमध्ये नाटकाचा हा महाकुंभ झाला आहे. हिंदुस्थानात प्रथमच जागतिक नाटय़ मेळा होतोय, त्याचा नाटय़ रसिकांनी नक्कीच आस्वाद घ्यावा. कारण ‘ऐसे मोके बार बार नही आतें.’