चार लाखांचा ऐवज चोरणाऱ्याला ४८ तासांत अटक

सामना प्रतिनिधी, मालवण

दोन दिवसांपूर्वी मालवण कुंभारमाठ येथील दीपक मिठबावकर यांच्या बंगल्यावर डल्ला मारून सुमारे ४ लाख ११ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत किरण अजप्पा नाईक रा. कुंभारमाठ, मूळ बेळगाव या सेंट्रिंग कामगाराच्या मुसक्या आवळल्या असून आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे.

कुंभारमाठ म्हाडा कॉलनीजवळ दीपक मिठबावकर हे आपली पत्नी आणि मुलीसमवेत राहतात. १४ ऑगस्ट रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दीप्ती मिठबावकर या दरवाजाला कुलूप न घालता फक्त कडी घालून त्या शेजाऱ्यांकडे गेल्या होत्या. याचदरम्यान अज्ञाताने बंगल्यात प्रवेश करून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कमेवर डल्ला मारला होता. याबाबत पोलिसात चोरीची खबर देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला चोरीप्रकरणी पोलिसांनी कुंभारमाठ तंत्र निकेतन रोड येथे राहणाऱ्या किरण अजप्पा नाईक मूळ राहणार होमगा, जनता कॉलनी, बेळगाव या सेंट्रिंग कामगाराला आज सकाळी साडेसहा वाजता अटक केली आहे. नाईक याच्याकडून ३६०० रुपये किमतीचे गणपतीचे लॉकेट, ४९०० रुपये किमतीचे तिरुपतीचे चित्र असणारे लॉकेट आणि १३३० रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे.

कसा सापडला चोरटा…
१४ ऑगस्ट रोजी सायंकाळी चोरी झाली त्यावेळी संशयित किरण नाईक हा चोरी झालेल्या बंगल्याच्या बाहेर शेजाऱ्यांना दिसून आला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासात किरण नाईक याला १६ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती गुरुवार, १७ ऑगस्ट रोजी त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.