माजी झेडपी सदस्याच्या घरावर साडे पाच लाखांचा दरोडा

सामना प्रतिनिधी । जालना

परतूर तालूक्यातील दैठणा खु.येथे दरोडेखोरांनी माजी जि. प. सदस्य अमृतराव देविदासराव सवने यांच्या घरात घरफोडी करत ५ लाख ७० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन पोबारा केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. रात्री एकच्या सुमारास घडली. या प्रकरणी आष्टी पोलिसात अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक इजपवार घटनेचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालूक्यातील दैठणा खुर्द गावातील अमृत सवने हे शिक्षक आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या सवने यांच्या घरी रात्री १.३० च्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्या वेळी अमृत सवने व त्यांच्या पत्नी हे दोघेच घरी होते ते एका खोलीत झोपलेले होते. त्यांच्या खोलीला चोरट्यांनी बाहेरुन कडी लावली तर दुसऱ्या खोलीचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाट फोडून त्यातील पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत ४ लाख ५० हजार, चांदीचे दागिने, ५०० ग्राम वजनाचे २० हजाराचे चांदीचे दागिने तसेच एक लाख रुपये रोख असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांची धाडसी चोरी केली.

दरोडेखोर सवने यांच्या घरात जाण्याआधी त्यांनी आजुबाजूच्या घरांच्या कड्या बाहेरुन लावल्याने चोरी केल्यानंतर त्यांना पळून जाता आले. या प्रकरणी आष्टी पोलिसात अज्ञात दरोडेखोरांविरोधात कलम ४५७,३८० नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद इज्जपवार करत आहेत.