जामखेडमध्ये अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून एक लाख अडोतीस हजाराची केली चोरी

सामना प्रतिनिधी । जामखेड

शहरातील मध्यवर्ती भागातील राळेभात गल्ली या ठिकाणी तीन अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश करून कोयता व तलवारीचा धाक दाखवून एक लाख अडोतीस हजार रूपयांचा ऐवज चोरुन नेला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण जगताप यांनी भेट दिली असून नगर येथून श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

अमोल भिकू राळेभात (३५) हे दि. १३ रोजी रात्री झोपले असतांना पहाटे २.४५ वा. अचानक त्यांच्या डोळ्यासमोर बॅटरीचा फोकस आल्याने त्यांना जाग आली. यावेळी त्यांना तीन चोरटे दिसले. एकाच्या हातात चाकू तर दुसर्‍याच्या हातात कोयता होता. कोयता व चाकूचा धाक दाखवून त्यांना अंथरूणातच रोखून त्यांनी कपाटाचे लॉकर तोडले. कपाटातील रोख रक्कम व पँटच्या खिशातील व टेबलावरील मोबाईल उचलला व दरवाजाला बाहेरून कड्या लावून चोरटे पसार झाले.

कपाटात १ लाख २६ हजार रूपये होते तर १२ हजार ८०० रुपये किंमतीचे दोन मोबाईल त्यांनी चोरून नेले. राळेभात यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. मिस्त्री व कामगारांची मजूरी देण्यासाठी त्यांनी पैसे घरात आणून ठेवले होते. चोरट्यांनी त्यावर रात्रीच डल्ला मारला.