पोलिसांच्या पेट्रोल पंपाचे पाच लाख रुपये लुटले

सामना प्रतिनिधी । सोलापूर

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या ढिसाळ व अकार्यक्षम कारभाराचा फटका आता खुद्द पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच बसला आहे. गेले काही दिवस पोलीस असल्याची बतावणी करून लोकांना लुटले जात होते. आता मात्र सोलापुरात चोरटय़ांनी कहरच केला असून, सहायक फौजदाराला मारहाण करून पोलिसांच्या पेट्रोल पंपावरीलच पाच लाखांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, पोलीस चौकीजवळच असलेल्या पोलिसांच्या पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडल्याने सोलापुरात खळबळ माजली आहे.

सोलापूर शहरात अशोक चौक भागात पोलीस मुख्यालयालगत असलेल्या जागेत भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला होता. पोलीस आयुक्तालयाकडून हा पेट्रोल पंप चालविला जातो. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक व सहायक फौजदार मारुती लक्ष्मण राजमाने (वय ५६, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) हे पेट्रोल पंपातील दिवसभराची रक्कम घेऊन पोलीस मुख्यालयाकडे निघाले होते. हे अंतर अवघे १० ते १५ मिनिटांचे आहे. मार्कंडेय जलतरण तलावाजवळ चोरटय़ांच्या टोळक्याने फौजदार राजमाने यांना अडविले. त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्यांच्यावर चाकूने वार केले. या मारहाणीनंतर चोरटय़ांच्या टोळक्याने फौजदार राजमाने यांच्याकडील काळ्या रंगाच्या बॅगमध्ये असलेली पाच लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.