कामगारांचे हक्क बळकावण्यासाठी शहरी नक्षलवादाचा बागुलबोवा : प्रकाश आंबेडकर

सामना प्रतिनिधी । नागपूर

शहरी नक्षलवाद नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. संघटित आणि असंघटित कामगारांचे हक्क बळकावण्यासाठीच मोदी सरकारने शहरी नक्षलवादाचा बागुलबोवा उभा केला असून पोलीस विभाग त्याचा दुरुपयोग करीत असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात बोलताना केली.

“शहरी नक्षलवाद अस्तित्वातच नाही. नक्षलवादाची भीती दाखवून सत्ताधारी लोक भांडवलदारांचे हित जोपासत आहे. पोलीस त्याचा दुरुपयोग करीत आहेत. अलीकडे झालेल्या कारवाईतून ते दिसून आले आहे,” असे आंबेडकर म्हणाले.

राज्यात ओवेसींच्या एमआयएम पक्षासोबत भारिप युती करणार असल्याची माहिती देताना आंबेडकर यांनी सांगितले की “एमआयएमकडून सहमतीचे पत्र आले आहे. लवकरच ओवेसींसोबत भेट होणार आहे. भारिपने काँग्रेसला बारा जागा मागितल्या होत्या. मात्र, त्यांचे कुठलेच उत्तर आले नाही. त्यामुळे आम्ही आता एमआयएम सोबतच युती करणार,” असेही ते म्हणाले.

सध्या सवर्ण विरुद्ध दलित आंदोलनातून आरक्षणाचे समर्थक व विरोधकांमध्ये संघर्ष पेटण्याची भीती असून निवडणुकीपूर्वीच याचा भडका उडू शकतो. सरकारने आताच त्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे, असा इशाराही आंबेडकरांनी यावेळी दिला.

दलित शब्दाचे समर्थन करून रामदास आठवले यांनी त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे, याकडे लक्ष वेधले असता या वादातून काहीच साध्य होणार नसल्याचे ते म्हणाले. दलित शब्दावरून १९८० मध्येही असा वाद झाला होता. तेव्हा नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे यांच्या विरुद्ध इतर असा हा वाद रंगला होता. त्या वादातून ज्यांना दलित शब्दाचा वापर करायचा आहे, त्यांनी तो वापरावा व ज्यांचा आक्षेप आहे, त्यांनी तो वापरू नये, असाच निष्कर्ष निघाला होता, असे ते म्हणाले.

जागतिक संघटना वर्ल्ड वेल्थ बोर्डच्या अहवालानुसार देशातील ७५ हजार श्रीमंत कुटुंब सुमारे ८२३० बिलियन डॉलर एवढी संपत्ती विकून परदेशात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडे डॉलरच उरलेले नाहीत. त्यामुळे रुपयाची घसरण होऊन डॉलर वाढतो आहे. त्याचा फटका भारत सरकारला बसत आहे. सरकारने त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास १९९० सारखी गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही आंबेडकर यांनी यावेळी दिला.