१३ लाखांचे दागिने चोरणाऱ्या तिघांना बेड्या

70

ठाणे–कळवा भागात तब्बल १४ घरफोड्या करून १३ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हारूण अहमद शेख, लाला काळे व अरविंद काळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून सर्व दागिने जप्त केले आहेत. या त्रिकुटाने आणखी काही घरफोड्या केल्या असल्याचा अंदाज असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

कळवा भागात अनेक चाळी तसेच कच्ची घरे असून त्यांचे दरवाजे देखील सुरक्षित नाहीत. अनेक दरवाज्यांचे कडीकोयंडे हलक्या दर्जाचे आहेत. चोरट्यांनी अशी कमकुवत घरे हेरून डाव साधला. तुटलेल्या अवस्थेत असलेले कडीकोयंडे कोणत्या दरवाज्याला आहेत याचा मागोवा घेऊन त्यांनी १४ घरफोड्या केल्या असल्याचे परीमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष म्हणजे या चोरट्यांनी पैसे न चोरता थेट सोन्याच्या दागिन्यांवरच डल्ला मारला.

गेल्या सात ते आठ महिन्यात या घरफोड्या झाल्या असून रात्रीचे पेट्रोलिंग सुरू असताना हारूण शेख यास रेल्वे स्टेशनजवळ पकडले. तर नाना काळे व अरविंद काळे या दोघांना देखील पोलीस अंमलदारांनी पेट्रोलिंगच्या दरम्यान ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर तिघांनी कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या केल्याचे कबुल केले. गेल्या तीन वर्षांपासून ही टोळी कार्यरत होती. या टोळीतील काही आरोपी उत्तरप्रदेशातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.ई. भालसिंग, एम.एन. धाडवे, एस.एच. पाटील यांच्या टीमने ही लक्षणिय कामगिरी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या