चोरट्यांच्या अफवांना सोशलमीडियावर उधाण, पोलिसांची पळापळ

विनोद पवार । पुणे

‘लांडगा आला रे लांडगा आला…’ ही गोष्ट आपण लहानपणी शाळेत असताना ऐकली असेल. सध्या या गोष्टीचा प्रत्यय मावळातील नागरिक घेत आहेत. चोरटे आल्याच्या अफवा सोशलमीडियावर फिरत आहेत. या गल्लीतून त्या गल्लीत चोरटे गेले… चोरट्यांनी अंगाला ऑईल लावले आहे… असे संदेश व्हॉट्‌सअॅप ग्रुपवर फिरत आहेत. त्यामुळे चोरटे आल्याच्या अफवांनी मावळातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून रात्र-रात्र जागून काढत आहेत.

लोणावळा, वडगाव, तळेगाव दाभाडे परिसरात गेल्या एक महिन्यापासून चोरटे आल्याच्या अफवा सोशलमीडियावर फिरत आहेत. रात्री आठ साडेआठ वाजता चोरटे आल्याचे फोन पोलिसांना येत आहेत. पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होतात. पोलीस घटनास्थळी गेल्यावर चोरटे पळून गेल्याचे नागरिक सांगत आहेत. या दिशेने गेले, त्या दिशेने चोरटे गेल्याचे पोलिसांना सांगितले जाते. पोलीस पाठलाग करतात मात्र कोणच आढळून येत नाही. ‘धारदार हत्यारे घेऊन १० ते १५ जणांचे टोळके आले आहे. नागरिकांनी पकडू नये म्हणून त्यांनी अंगाला ऑईल लावले आहे. परिसरातील लाईट बंद करुन चोऱ्या करत आहेत’, अशा अफवा गेल्या एक महिन्यापासून वडगाव, लोणावळा, तळेगाव-दाभाडे परिसरात फिरत आहेत.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुट पाटील म्हणाले, चोरटे आल्याच्या केवळ अफवा आहेत. रात्री पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असते. नागरिकांना माझा आणि पोलीस अधिकाऱ्यांचाही मोबाईल क्रमांक दिला आहे. चोरटे आल्याचा अफवा सुरू झाल्यापासुन पोलिसांनी पेट्रोलिंग वाढविले आहे. चोरटे आल्याच्या केवळ अफवा असून यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, त्यांनी नागरिकांना केले आहे.

गेल्या महिन्याभरापासून वडगाव परिसरात चोरटे आल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. रात्री आठ वाजता चोरटे आल्याचे पोलिसांना फोन येत आहेत. आम्ही घटनास्थळी गेल्यावर काहीच नसते. त्यामुळे पोलीस रात्रीची अधिकची गस्त वाढविणार आहेत. चोरटे आल्याच्या केवळ अफवा असून नागरिकांनी याच्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन, वडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप काळे यांनी केले आहे. तसेच चोरटे आल्याचे खोटे संदेश व्हॉट्सग्रुपवर फिरवाणाऱ्याविरोधात पोलीस कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.