कोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली

43

सामना प्रतिनिधी । कोपरगाव 

नगर- मनमाड महामार्गावर असलेल्या यामाहा कंपनीच्या साई स्वरूप बाईक्स या शोरूममध्ये रविवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी पहारेकऱ्याला चाकूचा धाक दाखवून 86 हजार 542 रुपयांची एक यामाहा कंपनीची एफ झेड 150 मोटारसायकल, व इतर असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरापासून दोन किमी अंतरावर नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या साई स्वरूप बाईक्स या यामाहा कंपनीच्या मोटरसायकलचे शोरूम असून रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास डिस्कवर व स्प्लेंडर या दोन मोटारसायकलवर येत अज्ञात चार चोरट्यांनी शोरूम बाहेर असणारा पहारेकरी बाळू अव्हाणे यास चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर शोरूमचे मागील बाजूचे शटर तोडून 86 हजार 542 रुपयांची एक यामाहा कंपनीची एफ झेड 150 मोटारसायकल, 4 हजार 470 रुपयांचे पाच हेल्मेट, 3 हजार रुपये किमतीचे वापरातील पान्हे, 1 हजार रूपये किमतीचा जीओ कंपनीचा मोबाईल, आठशे रुपये रोख रक्कम असा ऐकून 95 हजार 812 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याबाबत बाळू आगाजी अव्हाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला  असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या