अर्धा किलो सोने चोरणाऱ्या आरोपींना अवघ्या ३ दिवसात अटक

सामना ऑनलाईन, पनवेल

पनवेलजवळ ४ चोरट्यांनी कारागिरांकडे असलेले अर्धा किलो सोने आणि ८८ हजार रूपये लुटून नेणाऱ्या आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. २७ तारखेला या कारागिरांकडून सोनं आणि रोख रक्कम चोरून हे आरोपी पळाले होते. कामोठ्यातील सेक्टर -२५ जवळ ही घटना घडली होती.

या प्रकरणी पोलिसांनी मोफीस शेख(वय-२२ वर्ष) अरविंद औटे(वय-१९ वर्ष) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ,चोरी केलेलं सोनं विकण्याच्या तयारीत असतानाच त्यांनी पोलिसांनी अटक केली. या आधीही त्यांनी अशाच पद्धतीने सोनं चोरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गर्दी जमल्याने त्यांनी पळ काढला होता.

विशाल शेंडगे आणि गोरख शिंदे हे कामोठे वसाहतीमध्ये असलेल्या सोन्याची पेढीमध्ये सोने गाळण्याचे ते काम करतात. हे दोघेजण अर्धा किलो सोनं आणि रोख रक्कम घेऊन पनवेलला सोनं तपासण्यासाठी निघाले होते. सेक्टर-२५ विटभट्टीजवळ अचानक त्यांच्या बाजूला मोटरसायकलवर बसलेले दोन जण आले आणि त्यांनी आम्हाला शिव्या का देतो असे बोलून भांडण सुरू केलं आणि त्यांनी या दोन कारागिरांना मारहाण करायला सुरूवात केली. मारहाण करत असतानाच आरोपींनी दोघांकडचे सोने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला होता.

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा-२ने कमी कालावधीमध्ये या गुन्हाचा तपास लावून आरोपींना गजाआड केल्यानं त्यांचं कौतुक केलं जात आहे. पोलीस शिपाई सम्राट डाकी यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत हे आरोपी सोनं विकायला पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी ते रूपाली टॉकीजकजे जाणाऱ्या रस्त्यावरील इलाहाबाद बँकेसमोर येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे या आरोपींना अटक करण्यात आली. त्यामुळे सम्राट डाकी यांच्या कार्याचाही विशेषत्वाने गौरव केला जातोय.