नाचत गात आले, ५ दुकानं लुटून गेले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत चोरांचा सुळसुळाट झाला आहे. कायदा सुव्यवस्थेचे दिल्लीत तीनतेरा वाजल्याने चोरांची हिंमतही वाढली आहे. यामुळे ही चोर मंडळी आता चोऱ्या करण्यासाठी येताना वरातीप्रमाणे नाचत गात येत आहेत. अशाच एका टोळक्याचा नाचतानाचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हे टोळके नाचत गात आले आणि चक्क पाच दुकानं लुटून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

विशेष म्हणजे, यातील एका चोराने सीसीटीव्हीकडे बघतच मिथुन स्टाईलने नाचही केला. पण त्यावेळी चेहरा झाकण्यास तो विसरला नाही. जुन्या दिल्लीतील नॉव्हेल्टी सिनेमागृहाशेजारील रंग महल गल्लीतला हा व्हिडीओ आहे. तो कॅमेऱ्यासमोर पोलिसांना चिडवण्यासाठीच आल्याचे बोलले जात आहे. चोराच्या या नाचानंतर त्याच्या साथीदारांनी गल्लीतील पाच दुकानांचे शटर फोडले. पण हे काम करतानाही मध्येच ते रस्त्यावर येऊन नाचत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानाचे शटर तोडण्यात आल्याचे बघून दुकानदारांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर सीसीटीव्ही बघताच त्यांना ही नाचणारे चोर दिसले. चोरट्यांनी सकाळी चारच्या सुमारास ही दुकान फोडली होती. पहिल्या दुकानातून दीड लाख रुपयांची रोख रक्कम, १०-२० हार्ड डिस्क, २०-२५ रॅम, मोबाईल सेट चोरून पळाले. त्यानंतर तीन दुकानांची शटर त्यांनी फोडली. यातील एक मेडिकल दुकान होते. त्यातूनही बरीच रोकड या टोळक्याने लंपास केली. या भागात आधीही अशाप्रकारे चोऱ्या झाल्या असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.