अंधश्रद्धेचा कहर! मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी कबर खोदली आणि …

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । लखनौ

यांत्रिक युगामध्ये आजही काही लोकं तंत्र-मंत्र आणि काळ्या जादूच्या आहारी जाताना दिसून येतात आणि अंधश्रद्धेला बळी पडतात. उत्तर प्रदेशमध्ये असाच एका अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका वडिलांनी मृत मुलाला पुन्हा जिवंत करण्याच्या आशेने त्याला कबरीतून बाहेर काढले आणि पुन्हा दफन केले. पीडित वडिलांना एका तांत्रिकाने सांगितले की, जर मृतदेहाच्या डोक्यावरील केस ओढल्यानंतर उखडून आला नाही तर तो मुलाला पुन्हा जिवंत करेल. विशेष म्हणजे अंधश्रद्धेचा हा खेळ सुरू असताना पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत होते.

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, हा सर्व प्रकार कुसमौर गावात घडला आहे. याच गावातील रामगरीब नावाच्या व्यक्तीला भीम नावाचा आठ वर्षाचा मुलगा होता. एका आठवड्यापूर्वी सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर गावकरी आणि कुटुंबीयांनी एकत्र येत त्याचा मृतदेह कुआनो नदीजवळ दफन केला. त्यानंतर दु:खात बुडालेला रामगरीब कचहरी येथे गेला. येथे त्याला एका व्यक्तीने संतकबीरनगरमध्ये एक तांत्रिक राहतो जो मृत मुलांना जिवंत करतो असे सांगितले.

रामगरीबला मुलगा जिवंत होईल अशी आशा निर्माण झाली आणि तो तांत्रिकाला शरण गेला. यानंतर तांत्रिकाने त्याला मुलाचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यास सांगितले आणि मृतदेहाच्या डोक्यावरील केस उखडण्यास सांगितले. तांत्रिकाच्या मते डोक्यावरील केस उखडून आला नाही तर तो मुलाला पुन्हा जिवंत करू शकेल. परंतु मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याचे केस उखडून आले. यानंतर मृतदेह पुन्हा दफन करण्यात आला. या प्रकरणी कोणीही तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दिला आहे. परंतु अंधश्रद्धा वाढवणाऱ्या तांत्रिकाला अटक करण्याची मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.