अखेर चमचमची प्राणज्योत मालवली, तृतियपंथीयांचा नेता सेनापतीला अटक

155

सामना प्रतिनिधी । नागपूर

आठ दिवसांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर मृत्यूशी झुंज देत असताना हृदयविकाराचा धक्का बसल्याने तृतीयपंथी चमचम प्रकाश गजभियेचा आज सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी कळमना पोलिसांनी मुख्य आरोपी उत्तमबाबा सेनापती याच्यासह पाच आरोपींवर हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे.

तृतीयंपथींयांचा गुरू उत्तमबाबा सेनापती (रा. कामनानगर) याने पैशाचा वाद आणि शहरात वर्चस्व राखण्यासाठी साथिदार चट्टू ऊर्फ कमल अशोक उईके, किरण अशोक गवळी , सोनू पारशिवनीकर व शेख निसार शेख सादिक यांच्या मदतीने किन्नर चमचम गजभीये हिच्यावर चाकू, तलवार आणि सत्तूरने प्राणघातक हल्ला केला होता. गंभीर जखमी चमचमला तिचा प्रियकर नौशाद आणि शिष्य राखी हिने लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गेल्या मंगळवारी रात्री तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. गेल्या दोन दिवसांपासून तिच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा होत होती. मात्र, आज सोमवारी ती बेशुद्ध असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. त्यामुळे चमचमची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून उत्तमबाबासह पाच जणांना अटक केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या