नागपूर हादरले, तृतीयपंथीयांचा नेता सेनापतीचा चमचमवर प्राणघातक हल्ला

142

सामना प्रतिनिधी । नागपूर

वर्चस्वाच्या वादावरून मंगळवारी तृतीयपंथीयांचा नेता उत्तमबाबा सेनापती याने साथीदारांच्या मदतीने एकेकाळी त्याची अगदी जवळची आणि खास असलेल्या चमचमवर प्राणघातक हल्ला केला. शस्त्रांनी सपासप वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या चमचमवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कळमना पोलिसांनी या प्रकरणात कामगारनगर निवासी उत्तमबाबा तपन सेनापती (38), त्याचा जावई हंसापुरी, छोटी खदान निवासी चट्टू ऊर्फ कमल अशोक उइके (21) आणि यशोधरानगर निवासी किरण अशोक गवळे (39) यांना अटक केली आहे, तर 3 आरोपी फरार आहेत. जखमी चमचम ऊर्फ प्रविण प्रकाश गजभिये (25, रा. एनआयटी कॉलनी, मानकापूर) ची स्थिती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी चमचमची साथीदार राशी वसंत खोब्रागडेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. इतर 3 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तमबाबा पूर्वी ऑटो चालवायचा. काही वर्षांपूर्वी उत्तमने शहरातील तृतीयपंथीयांना संघटीत करून एक गट तयार केला. अनेक वर्षांपासून चमचम त्याच्यासोबत होती आणि सर्व तृतीयपंथीयांमध्ये त्याची खास होती. यामुळे सर्व तृतीयपंथीयांमध्ये तिलाही मान होता. सर्व तिचे ऐकत होते. उत्तमबाबा आणि चमचम स्वतंत्र विदर्भ आंदोलनातही सक्रिय होते आणि अनेक आंदोलन त्यांनी सोबत मिळून केले. उत्तमने कामनानगर येथील त्याच्या तीन मजली इमारतीत बाहेरून आलेल्या काही तृतीयपंथीयांना आसरा दिला होता. दररोज सकाळी 9 वाजता शहरातील तृतीयपंथी उत्तमच्या घरी जातात. तेथून ढोलक घेऊन ऑटोमध्ये वेगवेगळ्या भागात जातात आणि लग्न, बारसे व इतर समारंभात गाणे-वाजवणे करून पैसे गोळा करतात. गोळा झालेले सर्व पैसे दुपारी उत्तमच्या घरी जमा करण्यात येतात. असा क्रम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.

पैशांवरून उद्भवला वाद
मात्र पैशांच्या वाटणीवरून उत्तम आणि चमचममध्ये काही दिवसांपासून खटके उडू लागले. उत्तमच्या मते चमचम व तिची टोळी मिळणारे पैसे आणि अन्न धान्यातील काही भाग स्वत:कडेच ठेवून अपहार करीत होते. त्याच्याकडे पूर्ण रक्कम जमा केली जात नव्हती. तर दुसरीकडे चमचमच्या साथीदारांनी सांगितले की, उत्तम ऑटोमध्ये जाण्या-येण्याचे भाडे सुद्धा देत नव्हता. परिश्रम ते घ्यायचे आणि तो जमा झालेल्या पैशांवर ताव मारायचा. यामुळे 15 दिवसांपूर्वी उत्तम आणि चमचममध्ये जोरदार भांडणही झाले होते. तेव्हापासून तृतीयपंथीयांचे दोन गट झाले. काही लोकांनी चमचमला आपला नेता मानले तर काही उत्तमसोबत होते. चमचमच्या बाजूने जास्त लोक असल्याने उत्तमला त्याची खुर्ची धोक्यात दिसत होती.

घरातच रचला सापळा
नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास चमचम, राशी आणि नौशाद उत्तमच्या घरी पोहोचले. त्यांची एक साथीदार कामावर गेली नव्हती. चमचम आणि राशी गोळा झालेली रक्कम जमा करण्यासाठी उत्तमच्या घरात गेल्या. नौशाद बाहेरच ऑटोत बसला होता. उत्तमने घरातच सापळा रचून ठेवला होता. पैशांवरून चमचम आणि उत्तममध्ये पुन्हा भांडण सुरू झाले. उत्तम, किरण आणि चट्टूसह 6 लोकांनी मिळून चमचमवर हल्ला चढवला. वजनदार तीक्ष्ण हत्याराने चमचमवर वार करण्यात आले. तिच्या एका हाताच्या पंज्याचे 2 तुकडे झाले. डोके फुटून मेंदू बाहेर आला. राशी भीतीने आरडा-ओरड करत बाहेर पळाली. नौशादला घटनेची माहिती दिली. तेव्हापर्यंत वसुली करून दुसरी टोळीही तेथे पोहोचली होती. चमचमला तात्काळ ऑटोमध्ये टाकून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या