थर्टी फर्स्टला मालवणात पर्यटनाची धूम

सामना ऑनलाईन। मालवण

लाईक कराट्विट करा

देशभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मालवणातील दांडी येथील वॉटर स्पोर्टसचालक तसेच पर्यटन व्यावसायिकांनी आयोजित केलेल्या ‘सी फूड फेस्टिव्हल’चे नियोजन पूर्ण झाले आहे. मालवण दांडी किनाऱ्यावर २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत रंगणाऱ्या या महोत्सवात सागरी खाद्य मेजवानीसह मालवणी मत्स्य सुंदरी स्पर्धा महोत्सवात खास आकर्षण ठरणार आहे.

महोत्सवाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी २९ रोजी सायंकाळी ४ वाजता दांडी गाव कमिटीच्या उपस्थितीत होणार आहे. तीन दिवसाच्या कालवधीत पर्यटक व स्थानिक नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर पाककला वसागरी वस्तू प्रदर्शनाची अनोखी संधी मिळणार आहे.

गुरुवार २९ रोजी सायंकाळी ५ वाजता नौकानयन स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २०००,१००० रुपये अशी पारितोषिके  व ६ वाजता होममिनिस्टर स्पर्धा होणार असून विजेत्या दहा स्पर्धकांना पैठणी व साड्या देण्यात येणार आहेत. रात्री नृत्याविष्कार सादर केला जाणार आहे.

शुक्रवार ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता खुल्या गटातील मालवणी मत्स्य सुंदरी स्पर्धा होईल. यात विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ११ हजार १११, ५ हजार ५५५, तसेच १ हजार १११ रुपयाची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. यावेळी लावणी नृत्याविष्कार सादर केले जाणार आहेत. यात मालवण व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

शनिवार ३१ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजता खुली फन्सी ड्रेस स्पर्धा होईल. यातील विजेत्यांना २०००, १५००,१००० रुपये व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. रात्री आठ वाजता ऑर्केस्टा झंकारचे सादरीकरण होणार असून रात्रौ नववर्षाच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मच्छिमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पर्यटकांना तीनही दिवस सागरी मत्स्य पदार्थांची चव चाखता येणार आहे. नामांकित व्यावसायिकांचे खाद्य स्टॉल उभारले जाणार आहेत.  सौंदर्य सुंदरी व फन्सी ड्रेस स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पर्यटकांनी आपली नावे मनोज मयेकर (९४२३२१५४४४) व फूड स्टॉल धारकांनी आपली नावे दामोदर तोडणकर (९४०४७४२८४३) यांच्याकडे २५ डिसेंबरपर्यंत द्यावीत, असेआवाहन करण्यात आले आहे.