‘काँग्रेसमुक्त भारत’चा चुकीचा अर्थ लावला, काँग्रेस संस्कृती सगळ्याच पक्षात !

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

२०१९च्या निवडणुकांपूर्वी भाजप आकर्षक घोषणांचा पाऊस पाडणार अर्थसंकल्प आणेल असा कयास बांधला जातोय. मात्र १ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्पही इतर अर्थसंकल्पांप्रमाणेच असेल त्यात फार काही आकर्षक नसेल असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. लोकांना गोष्टी मोफत किंवा सवलतीच्या दरात हव्या असतात हा गैरसमज असल्याचं मोदींचं म्हणणं आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा सामान्य माणसाला आवडणारा अर्थसंकल्प असेल का असा प्रश्न विचारला असता मोदी म्हणाले की देशाला पुढे जायचं आहे, आर्थिकदृष्ट्या मजबूत बनायचं आहे का काँग्रेसच्या संस्कृतीचं अनुकरण करायचं आहे.

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोसच्या दौऱ्यावर असून ते इथे जागतिक आर्थिंक मंचाच्या शिखर बैठकीत सहभागी होणार आहेत. या अधिवेशनात त्यांना उपस्थितांना संबोधित करण्याची संधी मिळणार आहे. या दौऱ्यावर असताना टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले की माझ्या काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचा लोकांनी चुकीचा अर्थ घेतला आहे. काँग्रेस हा देशातील राजकीय मुख्यधारेतील पक्ष आहे, त्यामुळे सगळ्याच पक्षांची संस्कृती ही काँग्रेसमधून आली आहे. काँग्रेसमुक्त हिंदुस्थान म्हणजे काँग्रेस पक्षापासून देशाला मुक्त करणं नसून काँग्रेसच्या संस्कृतीपासून मुक्त करणं असा माझा म्हणण्याचा अर्थ असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. काँग्रेसनेही त्यांच्यातील वाईट गोष्टींपासून मुक्तता मिळवली पाहीजे असं मोदींचं म्हणणं आहे.

त्यांच्या सरकारच्या कामगिरीबाबत विचारलं असता पंतप्रधान मोदी म्हणाले की आम्ही उत्तम गुण मिळवत पास झालो आहोत.सामान्य माणसांच्या अपेक्षा पूर्ण केल्याने आम्ही हे करू शकलो असा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील आर्थिक परिस्थितीशी तुलना करत असताना मोदींनी महागाई दर कमी झालाय, परकीय गुंतवणूक वाढली आहे असं आपलं सरकार किती उत्तम काम करतंय हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.