८ किलोमीटर खाट खेचत रुग्णालयात आणली, डॉक्टरने वाचवले महिलेचे प्राण

सामना ऑनलाईन। ओडिशा

ओडिशातील ग्रामस्थांसाठी एक डॉक्टर देवदूत ठरला आहे. जंगल, डोंगर, नदी यांची तमा न बाळगता या डॉक्टरने सुदूर या दुर्गम गावात जाऊन महिलेची प्रसूती केली. पण अचानक तिची तब्येत खालावल्याने या डॉक्टरने चक्क ८ किलोमीटर अंतरापर्यत खाट खेचत आणून महिलेला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरने दाखवलेल्या या माणुसकीमुळे महिलेचे प्राण वाचले आहेत.

काही दिवसांपूर्वी ओडिशातील सुदूर या गावात एका महिलेला मध्यरात्री प्रसूतीकळा सुरु झाल्या. डोंगराळ भाग असल्याने या गावात मध्यरात्रीच्या वेळेस डॉक्टर येणे जवळपास अशक्यच होते. तरीही तिच्या पतीने बाजूचे गाव गाठले व तेथील दवाखान्यातील एका डॉक्टरला सोबत येण्याची विनंती केली. पण मध्यरात्रीच्या वेळेस किर् अंधारात जंगल, डोंगर, आणि नदी-नाले ओलांडून सुदूर गावात जाणे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. या मार्गावरुन गाडीने जाणे अशक्यच होते. तशातच येथील जंगलात अनेक वन्य हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याने ८ किलोमीटर लांब पायी जाणे म्हणजे जिवावर खेळण्यासारखेचे होते. पण तरीही या डॉक्टरने क्षणाचाही विलंब न करता महिलेच्या पतीबरोबर येण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर रात्रीच्या वेळेस पायी वाट तुडवत तो गावात पोहचला.त्याने महिलेची प्रसूतीही केली. पण त्यानंतर महिलेची तब्येत अचानक खालावली. तिच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार करणे गरजेचे होते. पण या मार्गावरुन कुठलेही वाहन नेणे अशक्य होते. यामुळे डॉक्टरांपुढे महिलेचे प्राण वाचवणे हे मोठे आव्हान होते.

पण तरीही कसलीही तमा न बाळगता या डॉक्टरने महिलेला खाटेवर झोपवले व ती खाट ८ किलोमीटर खेचत त्यांनी रुग्णालयात आणली. त्यानंतर महिलेवर तातडीने उपचार करण्यात आले. डॉक्टरने दाखवलेल्या या प्रसंगावधनामुळे महिलेचे प्राण वाचले यामुळे या डॉक्टरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.