लोकसभा निवडणूक ठरणार सर्वात महागडी, एकूण निवडणूक खर्च जाणार 50 हजार कोटी रुपयांवर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱया हिंदुस्थानात पुढील दोन महिने सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. दिल्लीतील सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या (सीएमएस) अहवालानुसार हिंदुस्थानातील ही निवडणूक प्रक्रिया जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरणार आहे. हिंदुस्थानच्या या संसदीय महानिवडणुकीवर यंदा तब्बल 50,000 कोटी रुपये (सात अब्ज डॉलर) इतका खर्च होण्याची शक्यता असून अमेरिकेतील निवडणुकीवर 2016 साली 6.5 अब्ज डॉलर खर्च झाले होते तर हिंदुस्थानात 2014 साली निवडणुकीवर 5 अब्ज डॉलर खर्च झाले होते.

सेंटर फॉर मीडिया स्टडीजने निवडणुकीतील खर्चासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारागणिक 8 डॉलर खर्च होणार आहे. हिंदुस्थानातील 60 टक्के नागरिकांचे दिवसाचे उत्पन्न तीन डॉलर असून त्या तुलनेत निवडणुकीत प्रत्येक मतदारावर होणारा खर्च अधिकच आहे. सीएमएसचे प्रमुख एन. भास्कर राव यांनी सांगितले की, निवडणुकीतील सर्वात जास्त खर्च हा सोशल मीडिया, प्रवास आणि जाहिरात यावरच होणार आहे.

543 जागांसाठी सुमारे 8 हजार उमेदवार रिंगणात
हिंदुस्थानातील निवडणुकीचा अभ्यास करणारे कोलंबिया विद्यापीठातील सायमन शोशार्ड यांच्या मते खर्चाची नेमकी आकडेवारी समोर येणे कठीणच आहे, मात्र निवडणुकीतील खर्च वाढणार हे स्पष्ट आहे. कारण मतदारसंघ वाढत असतानाच उमेदवारही वाढत आहेत. 543 जागांसाठी आठ हजारांहून अधिक उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याने स्पर्धा रंगतदार होणार आहे. दरम्यान, उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूवरून मतदार उमेदवार किती प्रभावशाली आहे हे ठरवतात, असे शोशार्ड यांचे म्हणणे आहे.