बिग बींच्या डोक्यावर हेअर बँड, नववर्षाचं स्पेशल सेलिब्रेशन

सामना ऑनलाईन । मुंबई

जगभरात मोठ्या उत्साहात, धुमधडाक्यात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. सर्व सामान्यांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटींनीसुद्धा २०१८ या नवीन वर्षाचं जंगी स्वागत केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी २०१८ या नव्या वर्षाचं स्वागत एक नवा ब्लॉग लिहून केलं आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत अमिताभ यांनी दोन खास फोटो शेअर केले आहेत. यामधल्या एका फोटोत आराध्या आजोबांसोबत धम्माल करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये आराध्या आणि तिची आतेबहीण म्हणजेच श्वेताची मुलगी नव्या या दोघीं पाहायला मिळत आहेत.

बिग बींनी आराध्यासोबतचा हा सेल्फी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यामध्ये अमिताभ यांचं त्यांच्या लाडक्या नातीसोबतचं नातं मनाला भावतं. आराध्याने तिचा टियारा (हेअर बँड) आजोबांच्या डोक्यावर ठेवला आहे. आजोबांचं हे रूप पाहून छोट्या आराध्याला हसू फुटलं आहे. त्यामुळेच बिग बी आणि त्यांची लाडकी नातं यांनी नववर्षाचं स्वागत करताना धम्माल केलेली पाहायला मिळत आहे.

बिग बींनी कुटुंबासोबत नववर्षाचं जंगी स्वागत केलं. त्यावेळचं एकंदरीत संपूर्ण सुंदर वातावरण त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये शब्दबद्ध केलं आहे. अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये ‘आठवड्याचा, महिन्याचा आणि वर्षाचा शेवटचा दिवस… एक आगळाच संगम….आणि येणाऱ्या ३६५ दिवसांचं स्वागत… मध्यरात्र झाली आहे… जुहू परिसरात काही ठिकाणी फटाके फुटताहेत… रस्त्यावर लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत आहे… आमचं संपूर्ण कुटुंब एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत… नातींच्या चेहऱ्यावरचा आनंद नवी ऊर्जा देणारा आहे… माझ्याकडून सर्व चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा’, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये आराध्याने नववर्षाच्या स्वागतासाठी स्वतःच्या हातांनी छोटी-छोटी ग्रीटिंग कार्ड्स आणि गिफ्ट्स बनवल्याचंही म्हटलं आहे. तिने स्वत: तयार केलेल्या भेटवस्तू सगळ्यांना दिल्या आणि लगेचच आमचा अभिप्रायही घेतला, असंही बच्चन आजोबांनी लिहिलं आहे. तसेच बिग बींची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची जलसा बंगल्याबाहेर प्रचंड गर्दी असते. त्यामुळेच अमिताभ यांनी चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देत फॅनसोबतचे काही फोटोही ब्लॉगमध्ये शेअर केले आहेत.