जर्मनीच्या मुलरला खुणावतोय विश्वविक्रम

सामना ऑनलाईन । मॉस्को

उत्कंठा टिपेला पोहोचलेल्या फिफा वर्ल्डकपचा दोन दिवसांनी शंखनाद होणार आहे. देशभरातील ३२ संघ फुटबॉल वर्ल्डकपच्या महायुद्धासाठी रशियामध्ये डेरेदाखल झाले आहेत. या सर्वोच्च स्पर्धेत ७३६ फुटबॉलपटू कौशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र या सर्व खेळाडूंमध्ये जर्मनीच्या थॉमस मुलरला यंदाच्या फिफा वर्ल्डकपमध्ये नवा विश्वविक्रम खुणावतोय.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये ५३ असे खेळाडू आहेत की त्यांच्या नावावर किमान एक गोलची नोंद आहे. यात गतविजेत्या जर्मनीच्या संघातील स्टार फॉरवर्ड थॉमस मुलरच्या नावावर सर्वाधिक १० गोल जमा आहेत. कोलंबियाचा जेम्स रॉड्रिग्ज ६ गोलसह दुसऱ्या स्थानावर आहे. जर्मनीचा माजी स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोजने फिफा वर्ल्डकपमध्ये २४ सामन्यांत १६ गोल ठोकले असून त्याचा हा विश्वविक्रम अबाधित आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या ब्राझीलच्या रोनाल्डोने १९ सामन्यांमध्ये १४ गोल नोंदविले आहेत.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंपैकी ६ खेळाडूंनी ५ किंवा त्याहून अधिक गोल केलेले आहेत. यात अर्थातच जर्मनीच्या थॉमस मुलरच्या नावावर सर्वाधिक १० गोल जमा आहेत. त्यानंतर कोलंबियाचा जेम्स रॉड्रिग्ज (६), अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी (५), अर्जेंटिनाचाच गोंजालो हिगुएन (५), उरुग्वेचा लुईस सुआरेज (५) व ऑस्ट्रेलियाचा टीम काहिल (५) यांचा नंबर लागतो.