मुंबईत ऑक्टोबरमध्ये म्हाडाच्या 1000 घरांची लॉटरी

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांसाठी घर खरेदी करणे दुरापस्त झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर सामान्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून म्हाडा मुंबईतील 1000 घरांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लॉटरी काढणार आहे.

म्हाडाच्या कोकण विभागीय लॉटरीच्या 9018 घरांची सोडत आज गृहनिर्माण भवन येथे काढण्यात आली. यावेळी मुंबईत म्हाडा मुंबईकरांच्या घराची स्वप्नपूर्ती व्हावी म्हणून  लवकरच एक हजार घरांची लॉटरी काढणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिली. तसेच कोणत्या भागात किती घरे असतील, त्याची किंमत काय, लॉटरी कधी जाहीर होणार, सोडतीची तारीख आदी माहिती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचेही मेहता यांनी सांगितले. या लॉटरीमध्ये ‘पंतप्रधान आवास योजने’ची घरे असणार नाहीत, मात्र एकूण घरांपैकी 90 टक्के घरे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील असणार आहेत.