मालवण तहसीलदारांची मुख्याधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत धमकी, नगरपरिषदेत तीव्र निषेध

6


सामना प्रतिनिधी । मालवण

मालवणचे तहसीलदार समीर घारे यांनी गुरुवारी दूरध्वनीवरून अर्वाच्च भाषेत धमकी दिल्याची तक्रार पालिका मुख्याधिकारी रंजना गगे यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याचा तीव्र निषेध शुक्रवारी नोंदविण्यात आला. नगरपरिषदेतील सर्व नगरसेवक व पालिका अधिकारी, कर्मचारी यांनी विरोधात घोषणा देत तहसीलदारांचा निषेध केला.

एका गुन्ह्यात पालिकेतील दोन कर्मचारी शासकीय पंच म्हणून देण्याची मागणी तहसीलदार यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र केंद्र शासनाची स्वच्छ सर्वेक्षण टीम मालवणात आल्याने नेमून दिलेल्या ठिकाणी सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. अतिरिक्त कर्मचारी नसल्याने पंच तातडीने उपलब्ध करणे शक्य झाले नव्हते. या संदर्भातील खुलासा ऐकल्यानंतर तहसीलदार प्रचंड चिडले आणि त्यांनी अर्वाच्च भाषा वापरल्याचे मुख्याधिकारी गगे यांनी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले होते. ही माहीती कळताच सर्वत्र तहसीलदारांच्याविरोधात तीव्र वातावरण निर्माण झाले.

मालवण नगरपरिषद प्रवेशद्वार येथे शुक्रवारी आजी, माजी नगरसेवक व पालिका कर्मचारी एकत्र आले आणि तहसीलदार समीर घारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, बांधकाम सभापती गणेश कुशे, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, नगरसेविका सेजल परब, ममता वराडकर, शिला गिरकर, तृप्ती मयेकर यासह पालिकेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या