हडोळती येथील शेतकऱ्याने दुष्काळामुळे तोडली तीन एकर केळीबाग

94

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

अहमदपूर तालुका कायम दुष्काळी म्हणून मराठवाडयात प्रसिद्ध आहे. दुष्काळाची झळा मागील दुष्काळापेक्षा तीव्र होताना दिसत असून उन्हाचा पारा ४३ अंश पोहचला आहे. पाणी उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी फळबाग उद्ध्वस्त करत आहेत. लेकराप्रमाणे सांभाळलेल्या बागा तीव्र दुष्काळामुळे जड अंतकरणाने शेतकरी तोडत आहेत.

कमी झालेले पर्जन्यमान त्यामुळे हताश झालेला फळबाग उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. हडोळती येथील शेतकरी मल्लिकार्जून बसलिंग निजवंते यांनी जीवापाड कष्ट करून सांभाळलेली केळी बाग तीव्र पाणीटंचाईमुळे एका दिवसात कटर मिशनद्वारे व कोयता चालवून केळी बांधावर फेकून दिली. चांगल्या उत्पादनाच्या आशेवर जोपासलेल्या या शेतकऱ्याला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे.

हडोळती येथील शेतकरी मालिकार्जुन बसलिंग निजवंते यांनी २५ जून २०१८ रोजी सिकदंराबाद येथून जी – नाईन या कंपनीच्या केळीची रोपे आणून आपली भावजय सरुबाई सुभाष निजवंते यांच्या सर्व्हे नं. १६२ मध्ये ३००० रोपाची लागवड केली. हिरवीगार दिसणारी केळी पाण्याअभावी जळताना पाहून निजवंते अक्षरशः हवालदिल झाले होते. चांगल्या उत्पादनाच्या आशेवर जोपासलेल्या या बागेला दुष्काळाचा फटका बसला. हाती उत्पादन पडण्याच्या आधीच पाण्याअभावी वर्षाच्या आतच बाग करपून मोठा फटका बसला. अडीच एकर मध्ये ३००० केळी लागवड केली तेव्हा विहीर व बोअरला मुबलक पाणी उपलब्ध होते. परंतु कालांतराने वाढते तापमान पाणी पातळी खालावली व बोअर आटले व विहीरीने तळ गाठला. त्यामुळे ऐन उत्पादन सुरुवात होणार त्यावेळेस पाणी उपलब्ध होवू शकले नाही व बाग उन्हाच्या तीव्रतेमुळे करपून गेली. त्यामुळे निजवंते यांना दोन लाखांचा फटका बसला. विहीरीचे पाणी आटले म्हणून त्यांनी ड्रीपव्दारे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला मात्र तोही प्रकार टीकला नाही. त्यामुळे केळी बाग तोडण्याची वेळ आली. त्यांची उपजिविका शेतीवरच अवलंबून असल्याने या शेतकऱ्यावर संकट ओढावले आहे.

खर्च दोन लाख, उत्पादन शुन्य
केळी बागेच्या लागवडीपासून ते व्यवस्थापने पर्यंतचा हा खर्च दोन लाखाचा जवळपास झाला असताना अडीच एकरमध्ये ३००० केळीची लागवड केली. त्यात खत, खुरपणी, तनविरळणी, फवारणी, ड्रीप व्दारे पाण्याची सोय हा खर्च होत असतानाच तिव्र पाणीटंचाईने चारही बोअर कोरडेठाक पडले, विहीरीने तळ गाठला. त्यामुळे रात्रंदिवस कबाडकष्ट केलेल्या बागेतून उत्पादन शुन्य आणि त्यावर खर्च मात्र दोन लाख रूपये झाल्याने ही बाग त्यांनी तोडण्याचा निर्णय घेतला.

या प्रसंगाने निजवंते यांना धक्काच बसला आहे. भांडवल संपल्यामुळे उत्पादनाच्या तोंडावर जिवापाड जपलेली ही केळी बाग तोडण्याची वेळ त्यांच्यावर आली. आता तोडणीसाठी पंधरा हजार खर्च अपेक्षित आहे. शासनाने सर्वेक्षण करून कोंडीत सापडलेल्या या शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी निजवंते यांनी ‘सामना’शी बोलतांना भावनाविवश होऊन दिली.

आपली प्रतिक्रिया द्या