मथुरेजवळ अपघातात एम्सच्या ३ डॉक्टरांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । मथुरा

मथुरेजवळ यमुना एक्सप्रेस वेवर भरधाव कारने एका टँकरला दिलेल्या धडकेत एम्सच्या तीन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर ४ डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. आग्र्याच्या दिशेने जात असलेल्या या गाडीच्या रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की गाडीतील तीन डॉक्टरांना जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये डॉ. हर्षद वानखेडे (३४), यशप्रीत काठपाल (२५), डॉ. हेमबाला (२४) यांचा समावेश आहे.

सुरीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा कारने एम्सचे सात डॉक्टर आग्र्याला जात होते. भरधाव असलेल्या कारने एका टँकरला धडक दिल्यानंतर ती दुभाजकाला जाऊन धडकली. त्यामुळे या गाडीत बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील जखमींना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले. जखमींमधील एकाची परिस्थिती गंभीर आहे.