चोवीस तासांच्या आत तिघा खूनी वाटमाऱ्यांना अटक

सामना प्रतिनिधी । भिगवण

इंदापूर तालुक्यातील डाळज नं. १ च्या हद्दीत सोमवारी रात्री नऊच्या सुमारास एका ४० ते ४५ वयोगटातील गृहस्थाचा वाटमारी करणाऱ्या तिघा जणांच्या टोळक्याने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून चोवीस तासांच्या आत भिगवण पोलिसांनी मोठ्या शिताफीने तिघा जणांना जेरबंद केले असून मृताची अद्याप ओळख पटली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोमवारी रात्री डाळज नंबर १ (ता.इंदापूर ) गावच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गाच्या सर्विस रस्त्याच्या कडेला महामार्ग पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर अनोळखी माणसाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या अंगावरील सर्व कपडे काढून नग्न अवस्थेत टाकले असल्याने मयताची ओळख पटविणे भिगवण पोलिसांपुढे आव्हान होते. मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे माहीती मिळवत चोवीस तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले. यात राहुल उर्फ भावड्या मच्छिंद्र जाधव वय २३, दिलीप बाळासाहेब जाधव वय २४ रा. दोघेही डाळज नं २, ता. इंदापूर तर गोपाळ वामन जाधव वय २६ रा. बोरी ता. इंदापूर, पुणे यांना अटक केली असून इंदापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायलयाने १८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बारामतीचे पोलीस उपअधिक्षक डॉ. संदीप पखाले, पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटना स्थळी भेट देत तपासाच्या दिशेने चक्रे फिरवली. तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड व त्यांच्या पथकाने लावत आरोपींच्या चोवीस तासांच्या आत मुसक्या आवळल्या. मृताची ओळख पटण्याआधीच मारेकरांचा शोध लावत चांगली कामगिरी केल्याने अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांनी भिगवण पोलिसांचे अभिनंदन केले.