पुण्यात ३५ लाखांचे मांडूळ, कासव जप्त,  तिघांना अटक 

सामना ऑनलाईन । पुणे
काळी जादू करण्यासाठी एकाला विक्री करण्यासाठी आणलेले तब्बल ३५ लाख रूपयांचे दोन मांडूळ व दोन कासव गुन्हे शाखेच्या युनीट दोनने जप्त केले असून, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी सिद्धार्थ ज्ञानेश्वर काठोते (वय २०, रा. जनता वसाहत, दत्तवाडी. मूळ रा. जालना), शाकीर जमील शेख (वय १९), फरदिन अशरफ खान (वय १९, रा. डोणजेगाव, ता. हवेली) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर वन्य जीवन संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हे तिघेही मित्र आहेत.
जनता वसाहत येथे मुलाकडे मांडूळ व कासव असल्याची माहिती युनीट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार कर्मचारी राजू केदारी, रुपेश वाघमारे, अनिरुद्ध सावर्डे व अतुल यांनी प्रथम बनावट ग्राहक पाठवून त्यांच्याकडे खात्री केली. त्यानंतर कारवाई करत या तिघांकडून दोन मांडूळ व दोन कासव जप्त केले. याची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल ३५ लाख रुपये किंमत आहे. हे प्राणी त्यांनी कोणाकडून आणले, कसे आणले, कोणाला विक्री करणार होते याचा तपास युनीट दोनचे वरिष्ठ निरीक्षक सतिश निकम करत आहेत.
पुण्यात यापूर्वीही मांडूळ व कासवाची तस्करी होत असताना कारवाई केली आहे. हे प्राणी काळी जादू करण्यासाठी वापरले जातात. मांडूळ, २१ नखांंचे कासव घरात असल्यानंतर धन प्राप्ती होते अशी अंधश्रद्धा आहे, त्यामुळे त्याची मागणी मोठ्याप्रमाणात असते. पोलिसांकडून तस्करांना पकडले जात असले तरी, या प्रकरणातील मुळाशी अद्याप पोलिसांना जाता आलेले नाही.