मोटरसायकल चोरणाऱ्यांना अटक

राजेंद्र वाडेकर । राहुरी

महागड्या मोटरसायकल चोरायच्या आणि त्यांच्या मदतीने विहीरीवरील मोटरपंप, हॉटेलमधील फ्रीज तसेच महागड्या वस्तू चोरुन पळ काढायचा असे उद्योग बिनबोभाट करणाऱ्या तीनजणांना देवळाली प्रवरा दूरक्षेत्राच्या पोलिसांनी अटक केली. इतर दोघेजण पळून गेले त्यांचा शोध सुरू आहे.

राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सतिश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, सतिश त्रिभुवन, गुलाब मोरे,गणेश फाटक या पोलीस पथकाने देवळाली प्रवरा बाजारतळ परिसरात ही कारवाई केली. तालुक्यातील गुन्हेगारीचे केंद्रबिंदू ठरलेल्या देवळाली प्रवरा गावात गेल्या तीन महिन्यांपासून वाहन चोरांनी उच्छाद मांडला होता.

मोटरसायकल चोरांच्या हालचालींवर देवळाली प्रवरा येथील पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून होती. लाखो रूपये किंमतीच्या धूम स्टाईल मोटर सायकलचा होणाऱ्या संशयास्पद वापराचा अखेर पोलिसांनी भांडाफोड केला. मोटरसायकल चोरांच्या टोळीतील गुन्हेगार देवळाली प्रवरा बाजार तळावरील हॉटेल मल्हार येथे चहा पिण्यासाठी आले असता, पोलीस पथकाने झडप घालून तिघांना पकडले.

ताब्यात घेतलेल्या तिघांना हिसका दाखवताच होंडा स्प्लेंडर,पल्सर,प्लॅटिना अशा ३ लाख रुपये किंमतीच्या ७ धूम स्टाईल मोटरसायकलची माहिती चोरट्यांनी पोलिसांना दिली. आधी मोटरसायकल चोरायची नंतर ठिकठिकाणी चोऱ्या करुन धूम स्टाईलने पळून जाण्यासाठी ती मोटरसायकल वापरायची. पोलिसांना माग काढणे कठीण व्हावे म्हणून ठराविक कालावधीनंतर सतत नव्या मोटरसायकलद्वारे चोऱ्या करायच्या या पद्धतीने चोरटे काम करत होते.