लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गोठ्यांना आग लागली, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

2

सामना प्रतिनिधी । बुलडाणा

लोणार तालुक्यातील सुलतानपूरमध्ये तीन गोठ्यांना आग लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही आग कोणीतरी मुद्दाम लावल्याचा संशय आहे. आग लावणाऱ्याने गगोठ्यातील गुरा-ढोरांना सोडून दिल्याने त्यांचा जीव वाचला आहे.

सुनील सदाशिव टकले, परशराम श्रीराम टकले, भगवान दर्याजी टकले, अनिल सदाशिव टकले, राजेश सदाशिव टकले यांचे गोठे अज्ञात व्यक्तीने हे गोठे पेटवून दिले. तसेच शेतातील गुरांच्या वैरणीचे कुटारही पेटवून दिले. यात तीन गोठे जळून खाक झाले. एक गोठा पेटल्यावर दुसर्‍या गोठ्यापर्यंत गवत न जळता इतर दोन गोठे पेटले. गोठ्यांनंतर १०० फुटांवरील कडबा,गवत, वैरणही पेटल्याने ही घटना अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.