मुळा-मुठेत बुडून माय-लेकीसह तिघींचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । लोणी काळभोर

कपडे धुण्यासाठी मुळा-मुठा नदीवर गेलेल्या माय-लेकीसह नणंदेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना हवेली तालुक्यातील थेऊर येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यामधील मुलीचा मृतदेह सापडला असून, इतर दोघींचा शोध सुरू आहे.

चंद्रकला एकराज उर्फ राजू भूल (वय २३) व सोनिया एकराज उर्फ राजू भूल (वय ४) या माय-लेकीसह नणंद भजन भगतिंसग भूल (वय १९) हिचा बुडून मृत्यू झाला.

मूळ नेपाळवरून आलेले भगतिंसग वीर बहाद्दूर भूल (वय ६०, सध्या रा. कुंजीर कॉम्प्लेक्स, थेऊर, ता. हवेली) हे थेऊर गावात सुरक्षारक्षकाचे काम करतात. आज सकाळी ११ वाजता त्यांची मुलगी भजन, सून चंद्रकला, नात सोनिया व अनिषा (वय ११), नातू अभिषेक (वय ८) हे पाचजण कपडे धुण्यासाठी मुळा-मुठा नदीकाठी गेले होते. कपडे धूत असताना चंद्रकलाची मुलगी सोनिया ही अंघोळ करण्यासाठी नदीत उतरली. सोनियाचा पाय घसरल्याने ती पाण्यात बुडू लागली. ती बुडत आहे, हे पाहून तिला वाचविण्यासाठी भजन व चंद्रकला यांनी नदीत उडी टाकली. परंतु, तिघीनांही पोहता येत नसल्याने त्या दोघीही पाण्यात बुडाल्या. त्यांच्या समवेत नदीकाठी असलेले अभिषेक व अनिषा हे दोघे रडत घरी आले. त्यांनी घडलेला प्रकार आजोबा भगतिंसग यांना सांगितला. भगतसिंग यांना नदीकाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तिघीही पाण्यात बुडाल्या. दरम्यान, या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड, पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवले हे घटनास्थळी पोहचले.

दरम्यान, एन. डी. आर. एफ.चे पथक, अग्निशमन दल तसेच स्थानिकांच्या मदतीने तिघींचा पाण्यात शोध घेतला. दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास सोनियाचा मृतदेह मिळून आला. सायंकाळी उशिरापर्यंत इतर दोघींचा शोध लागलेला नव्हता.