ममता कुलकर्णीचे तीन फ्लॅट होणार जप्त

सामना ऑनलाईन । ठाणे

कोट्यवधीच्या इफेड्रीन तस्करी प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत. ममता कुलकर्णी हिचे अंधेरीतील तीन प्रशस्त फ्लॅट पोलिसांनी जप्त करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली असून सध्या तिचे वास्तव्य केनियात असल्याने तिच्या विरोधात रेड कॉर्नर बजावण्यासाठी देखील पोलिसांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे तिच्या भोवतीचा फास अधिकच घट्ट झाला आहे.

सोलापूर येथील एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून मागील वर्षी दोन हजार कोटींचे इफेड्रीन ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणात विकी गोस्वामी आणि त्याची कथित पत्नी बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा देखील सहभाग असल्याचे चौकशीअंती समोर आले होते. तसेच इतर आरोपींना या प्रकरणी अटक होऊनही ममता पोलिसांच्या जाळ्यात सापडत नसल्याने तिला फरार घोषित करण्याची विनंती पोलिसांकडून न्यायालयाला केली होती. अखेर न्यायालयाने तिला फरार घोषित केल्यानंतर पोलिसांनी तिच्या अंधेरी येथील स्काय अँकरेज सोसायटीमधील निवासस्थानी नोटीस बजावली. मात्र या नोटिसीला तिच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने तिची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांची विनंती ग्राह्य धरून दिले.

याबाबत न्यायालयात अमली पदार्थविरोधी विशेष न्यायालयाचे न्या. एच. एम. पटवर्धन यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली.

अटक ‘अटळ’
सोलापूर इफेड्रीन प्रकरणाचा प्रमुख आरोपी व आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया विकी गोस्वामी आणि त्याची साथीदार अभिनेत्री ममता कुलकर्णी या दुकलीला याआधीच ठाणे विशेष न्यायालयाने फरार आरोपी घोषित केले आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस दोघांनाही देशाच्या कोणत्याही भागातून अटक करू शकतात, असे निर्देश देण्यात आले होते.