पारनेर बलात्कार प्रकरणी तिघे दोषी, उद्या शिक्षा दिली जाण्याची शक्यता

सामना ऑनलाईन,नगर

ऑगस्ट २०१४मध्ये एका शाळकरी मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर मुलीने कुठेही वाच्यता करु नये यासाठी त्या मुलीचे हालहाल करत ठार मारण्यात आलं होतं. हे घृणास्पद कृत्य करणारे तीनही आरोपी दोषी असल्याचं आज नगर जिल्हा सत्र न्यायालयाने जाहीर केलं. या तिघांना काय शिक्षा द्यायची यावर उद्यापासून युक्तिवाद सुरू होणार आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या आरोपींना दोषी ठरवण्यासाठी बिनतोड युक्तिवाद सादर केले होते.

संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे अशी दोषींची नावे असून त्यांनी २२ ऑगस्ट २०१४ साली लोणी-मावळा भागात दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी निघाली होती. यामुलीचं अपहरण केल्यानंतर या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिच्या डोक्यात स्क्रू ड्रायव्हर खुपसत आणि दगडाने ठेचत तिला मारण्याचा प्रयत्न केला. तरीही मुलगी जिवंत असेल असा विचार करत या तिघांनी तिच्या नाका तोंडात चिखल कोंबला आणि तिला ठार मारलं.

पारनेर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शरद जांभळे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला होता. वैद्यकीय तपासणीदरम्यान आरोपींच्या अंगावर जखमा आढळल्या होत्या. गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांवर असलेला चिखल, रक्ताचे डाग, आरोपींच्या कपड्यांवर असलेले रक्ताचे डाग चिखल हे न्यायवैद्यकशास्त्र तपासणीत जुळल्याने तो आरोपींविरोधात भक्कम पुरावा होता.