मराठा आरक्षणासाठी एकाच दिवशी तीन आत्महत्या, आतापर्यंत आठ जणांचे बलिदान

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील अभिजीत बालासाहेब देशमुख या उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेतला. तर फुलंब्री तालुक्यातील प्रदीप हरी मस्के या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याने गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्यामुळे आयटीआयला प्रवेश मिळाला नाही म्हणून विहिरीत उडी घेतली तर बुलढाण्यातही नंदू बोरसे या तरुणाने आरक्षण मिळत नसल्याने गळफास घेऊन जीवन संपवले. मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत आठ जणांनी बलिदान दिले असून दिवसेंदिवस या आंदोलनाची धग वाढतच आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाचा वणवा भडकला आहे. आरक्षणाचा निर्णय होत नसल्यामुळे मराठा तरुणांमध्ये अस्वस्थता असून आत्महत्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. आज तीन जणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. गंगापूर येथील काकासाहेब शिंदे, देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे, मुंबईच्या कोपरखैरणे येथील रोहन तोडकर, संभाजीनगर येथील प्रमोद जयसिंग होरे पाटील, नांदेड येथील कचरू दिगंबर कल्याणे अशी ही संख्या आज आठवर पोहोचली.

उच्चशिक्षित असूनही नोकरी नाही
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील उच्चशिक्षित असलेला अभिजीत बालासाहेब देशमुख हा एमएस्सी करूनही नोकरी मिळत नसल्यामुळे अस्वस्थ होता. त्याने बँकाकडे व्यवसायासाठी कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथेही त्याच्या पदरी निराशाच पडली. त्यातच आजारपणावर होणाऱ्या वारेमाप खर्चामुळे त्याची तगमग वाढली. आज सकाळी घराशेजारच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने खिशात ठेवलेल्या चिठ्ठीत ‘मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधी खर्च या कारणामुळे आत्महत्या करत आहे’ असे म्हटले आहे. अभिजीतच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.

अभिजीत देशमुख याच्या आत्महत्येची घटना उघडकीस येताच पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली. अभिजीतच्या कुटुंबाला तात्काळ ५० लाखांची मदत, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आदी मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातलगांनी घेतला. त्यामुळे तणाव वाढला. आमदार विनायक मेटे यांनी घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आणि तात्काळ मदत करण्याची मागणी केली. मुख्यमंर्त्यांनी मदतीचे आश्वासन दिल्यानंतर नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतला. विडेकरांनी आज सर्व व्यवहार बंद ठेवून अभिजीतला श्रद्धांजली वाहिली.

गुणवत्ता असूनही प्रवेश मिळाला नाही
फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील प्रदीप हरी मस्के या विद्यार्थ्याला ७५ टक्के गुण मिळवूनही आयटीआयला प्रवेश मिळाला नाही. परिस्थिती हलाखीची असल्याने अकरावीला प्रवेश घेण्यासाठीही पैसे नसल्याने विमनस्क अवस्थेत प्रदीपने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आरक्षण नसल्यामुळेच प्रदीपवर आत्महत्या करण्याची वेळ आली असा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी प्रशासनाच्या वतीने तात्काळ मदतीचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला.

आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या
बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील उबळखेड येथील नंदू बोरसे (४७) यांनी आंदोलन करूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे गळफास घेऊन जीवन संपवले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी अनेक मराठा क्रांती मोर्चांमध्ये सहभागी झालो परंतु आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

व्यर्थ न हो बलिदान
अभिजीत बालासाहेब देशमुख
प्रदीप हरिदास मस्के
नंदू बोरसे
काकासाहेब शिंदे
जगन्नाथ सोनवणे
रोहन तोडकर
प्रमोद होरे पाटील
कचरू दिगंबर कल्याणे