तीन हत्यांनी कल्याण हादरले, एका रुपयासाठी अंडीविक्रेत्याने घेतला जीव

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

तीन विविध हत्यांच्या घटनांनी कल्याण हादरले असून त्यापैकी एका ग्राहवाला केवळ एका रुपयासाठी आपला जीव गमावावा लागला आहे. एक रुपया जादा का घेतो यावरून झालेल्या वादात अंडीविक्रेत्याने ५४ वर्षांच्या ग्राहकाला जीव जाईपर्यंत मारहाण केल्याचा गुन्हा खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कल्याण परिमंडळ ३ मधील महात्मा फुले, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस ठाणे या तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हत्या झाल्या आहेत. कल्याण पूर्वेकडील आनंदवाडी परिसरात क्रिकेट मॅचच्या जुन्या वादातून गुरुवारी अशोक मालुसरे या तरुणाला याच परिसरात राहणाऱ्या तस्लिम शेख व लल्लन या दोघांनी बेदम मारहाण केली होती. उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर दुसरी घटना – कल्याणनजीक आंबिवली परिसरात घडली. पूर्व वैमनस्यातून सोनू सिंग या २८ वर्षीय तरुणाची हत्या त्याच्या शेजाऱ्याने केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. याप्रकरणी अस्वल सिंग याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तिसरी घटना एक रुपयाच्या वादातून झाली आहे.

कल्याण पश्चिमकडील रामबाग परिसरात राहणारे मनोहर गामने (५६) या इसमाने प्रभू ब्रदर्स दुकानातून दोन अंडी खरेदी केली असता दुवानदाराने अकरा रुपये झाले असे सांगितले. मनोहर गामने यांनी दोन अंडी सर्वत्र दहा रुपयांना मिळतात मग एक रुपया तुम्ही जास्त का घेता, असे दुकानदाराला सांगितले असता दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वादाचे पर्यवसान शिगेला पोहोचले व रागाच्या भरात दुकानदाराने वृद्ध इसमाला मारहाण करीत जमिनीवर पाडल्यामुळे वर्मी घाव बसल्याने मनोहर यांना जीव गमवावा लागला.

बँकेत चोरी करणारे सीसीटीव्हीत कैद
खर्डी – गावातील कॅनरा बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. इमारतीच्या मागील बाजूची खिडकी तोडून चोरट्यांनी तिजोरीच्या रूममध्ये शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हात अलार्म बटनला लागल्याने आवाज झाला आणि चोर पळून जाण्यात यशस्वी झाले. २ फेब्रुवारी रात्री २ ते ३ च्या दरम्यान हा प्रकार घडला असून चोरटे बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.